जगातील सर्वात मोठे सरोवर
जेव्हा कधी तलाव किंवा सरोवराबद्दल बोलले जाते, तेव्हा गावातील पाण्याचा छोटा स्रोत असा विचार मनात येतो, परंतु जगातील सर्वात मोठे सरोवर इतके मोठे होते, की त्यात अनेक नद्या सामावून जाऊ शकतील. किंवा एक महासागर यात सामावू शकते. अलिकडेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठ्या सरोवराचे नाव घोषित केले आहे. हे सरोवर आजपासून 1 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार पृथ्वीवर आतापर्यंतचे सर्वात मोठे सरोवर पॅराटेथिस होते, ज्याला मेगा लेक या नावाने देखील ओळखले जाते. हे सरोवर 1.2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात होते. हे सरोवर युरोपच्या आल्प्स पर्वतरांगेपासून मध्य आशियाच्या कजाकिस्तानपर्यंत होते. त्या काळात 28 लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र हे सरोवर व्यापून टाकत होते. यामुळे आजच्या काळातील भूमध्य समुद्रापेक्षाही हे सरोवर मोठे हेते. या सरोवरात 17 लाख क्यूबिक किलोमीटर ब्रॅकिश वॉटर होते. वैज्ञानिकांनी या मेगा लेकविषयी शोध लावण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर केला आहे. सरोवराच्या आकाराचे आकलन करण्यासाठी ऐतिहासिक टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींचे आकलन करण्यात आले. याचबरोबर फॉसिल, दगड आणि सेडिमेंट इत्यादींची पडताळणी करून वैज्ञानिकांनी हे सरोवर किती मोठे असेल याचा अंदाज बांधला आहे. हे सरोवर सुमारे 50 लाख वर्षांपर्यंत अस्तित्वात होते, परंतु हवामान बदल आणि टेक्टॉनिक प्लेट्सच्या बदलांमुळे याचा आकार कमी होत गेला.
विविध देशांच्या वैज्ञानिकांचे योगदान
सुमारे 70 लाख वर्षांपूर्वी या सरोवराने एक तृतीयांश पाणी गमाविले होते, तसेच याचे क्षेत्र देखील दोन तृतीयांशपर्यंत संपुष्टात आले होते. कालौघात हे सरोवर पूर्णपणे संपुष्टात आले आहे. काळा समुद्र, कॅस्पियन समुद्र, एरल समुद्र इत्यादी सर्व पॅराटेथिसमधूनच निर्माण झाले आहेत. पॅराटेथिसमध्ये असे जीव आढळून येत होते, जे अन्यत्र कुठेच नव्हते. या सरोवरासंबंधीचे संशोधन नेदरलँडच्या युटेक Aयुनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ साओ पावलो, रशियन अकॅडमी ऑफ सायन्स, सेंकनबर्ग बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट रिसर्च सेंटर जर्मनी आणि रोमानियाच्या युनिव्हर्सिटी ऑफ बूचारेस्टच्या वैज्ञानिकांनी मिळून केले होते.