लंकेचा संघ मोठ्या पराभवाच्या छायेत
34 शतकांसह रुटकडून कूकचा विक्रम मोडीत
वृत्तसंस्था/ लंडन
येथे सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेने दुसऱ्या डावात 5 बाद 182 धावा जमविल्या होत्या. इंग्लंडने लंकेला निर्णायक विजयासाठी 483 धावांचे कठीण आव्हान दिले. इंग्लंडच्या रुटने या कसोटीत दोन्ही डावात दमदार शतके झळकाविताना माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा विक्रम मोडीत काढला. इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये रुट 34 शतकांसह आघाडीवर आहे.
या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिला सामना जिंकून लंकेवर आघाडी घेतली आहे. लॉर्डस्च्या मैदानावर सुरु असलेल्या या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ आता मोठा विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 427 धावा जमविल्यानंतर लंकेचा पहिला डाव 196 धावांत आटोपला. इंग्लंडने 231 धावांची भक्कम आघाडी पहिल्या डावात मिळविली. इंग्लंडने उपलब्ध असतानाही लंकेला फॉलोऑन दिला नाही. इंग्लंडने दुसऱ्या डावात 251 धावा जमविल्या. जो रुटने 121 चेंडूत 10 चौकारांसह 103 धावा झळकाविल्या. ब्रुकने 1 षटकार 4 चौकारांसह 37, स्मिथने 3 चौकारांसह 26, डकेटने 2 चौकारांसह 24 तर अॅटकिनसनने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. लंकेतर्फे असिता फर्नांडो आणि कुमारा यांनी प्रत्येकी 3 तर रत्ननायके आणि प्रभात जयसूर्या यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. इंग्लंडने लंकेला विजयासाठी 483 धावांचे उद्दिष्ट दिले. इंग्लंडच्या रुटने पहिल्या डावात 143 धावांची खेळी केली होती.
लंकेने 2 बाद 53 या धावसंख्येवरुन चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. वोक्सने प्रभात जयसूर्याला झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. करुणारत्नेने 129 चेंडूत 7 चौकारांसह 55 धावा जमविल्या. स्टोनने त्याला स्मिथकरवी झेलबाद केले. उपहारावेळी लंकेची स्थिती 36 षटकात 3 बाद 95 अशी होती. उपहारानंतर करुणारत्ने तंबूत परतला. मॅथ्यूज आणि चंडीमल यांनी संघाचा संभाव्य पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 59 धावांची भागिदारी केली. शोएब बशिरने मॅथ्यूजला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या. चंडीमलने 42 चेंडूत 10 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. तो 11 चौकारांसह 55 तर कर्णधार धनंजय डिसिल्व्हा 4 धावांवर खेळत आहेत. लंकेला निर्णायक विजयासाठी अद्याप 301 धावांची गरज असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत.
रुटकडून कूकचा विक्रम मोडित
इंग्लंडचा अनुभवी आणि ज्येष्ठ फलंदाज जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 34 शतकांचा नवा विक्रम करताना माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा विक्रम मोडित काढला. लॉर्डस् मैदानावर शनिवारी रुटने आपले 34 वे शतक झळकाविल्यानंतर उपस्थित क्रिकेट शौकिनांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. यापूर्वी अॅलिस्टर कूकच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे 33 शतकांचा विक्रम नोंदविला गेला होता. पण रूटने तो मागे टाकला. रुटने शतक पूर्ण केल्यानंतर हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या वडीलांना आनंदाने मिठी मारली.
आता इंग्लंडतर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके नोंदविणारा रुट हा पहिला फलंदाज आहे. लंकेविरुद्धच्या या दुसऱ्या कसोटीत त्याने दोन्ही डावात शतके झळकवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रुटने आपल्या शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. सर्वाधिक शतके झळकाविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा सचिन तेंडुलकर 100 शतकांसह पहिल्या स्थानावर असून विराट कोहली 80 शतकांसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग 71 शतकांसह तिसऱ्या, लंकेचा कुमार संघकारा 63 शतकांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिकेचा कॅलिस 62 शतकांसह पाचव्या, दक्षिण आफ्रिकेचा आमला 55 शतकांसह सहाव्या, लंकेचा महिला जयवर्धने 54 शतकांसह सातव्या तर विंडीजचा ब्रायन लारा 53 शतकांसह आठव्या स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटमधील सध्या वावरत असलेल्या फलंदाजांमध्ये जो रुट दुसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने 50 आंतरराष्ट्रीय शतके नोंदविली असून या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा 48 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प. डाव 102 षटकात सर्वबाद 427 (रुट 143, अॅटकिनसन 118, डकेट 40, असिता फर्नांडो 5-102), लंका प. डाव 55.3 षटकात सर्वबाद 196 (कमिंदू मेंडीस 74, वोक्स, अॅटकिनसन, स्टोन, पॉट्स प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड दु. डाव 54.3 षटकात सर्वबाद 251 (रुट 103, ब्रुक 37, डकेट 24, स्मिथ 26, असिता फर्नांडो, कुमारा प्रत्येकी 3 बळी, रत्नायके, जयसूर्या प्रत्येकी 2 बळी), लंका दु. डाव 62 षटकात 5 बाद 182 (करुणारत्ने 55, मधुष्का 13, निशांका 14, मॅथ्यूज 36, चंडीमल खेळत आहे 55, डिसिल्व्हा खेळत आहे 4, स्टोन 2-22, वोक्स, अॅटकिनसन, शोएब बशिर प्रत्येकी 1 बळी).