For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूमी विभागाचे जुन्या मनपात होणार स्थलांतर

10:22 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
भूमी विभागाचे जुन्या मनपात होणार स्थलांतर
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर चर्चेला उधाण : मनपाकडून सभागृहाची स्वच्छता : सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार

Advertisement

बेळगाव : कचेरी रोडवरील जुन्या तहसीलदार कार्यालयात असणाऱ्या भूमी विभागाचे रिसालदार गल्ली येथील जुन्या मनपातील तहसीलदार कार्यालयात स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी मनपामधील सभागृहाची स्वच्छता करण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या कारभाराला सुसुत्रता येणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. तर गैरकारभार केल्याप्रकरणी भूमी विभागातील दोघा कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने चर्चेला उधाण आले आहे. कचेरी रोडवर असणाऱ्या जुन्या तहसीलदार कार्यालयाची इमारत मोडकळीस आली आहे. त्यामुळे तेथील तहसीलदार कार्यालय रिसालदार गल्ली येथील मनपा कार्यालयामध्ये अनेक दिवसांपूर्वी स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र लॅण्ड रेकॉर्ड व भूमी विभाग, तसेच सात-बारा उतारा वितरण विभाग जुन्या कार्यालयामध्येच ठेवण्यात आले होते. यामुळे तहसीलदारांना आवश्यक कामांसाठी कार्यालयातून कचेरी रोडवरील कार्यालयाला जावे लागत होते. त्यामुळे कामात व्यत्यय निर्माण होत होता. ही गैरसोय दूर करण्याबरोबरच कामामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी भूमी विभाग आता तहसीलदारांच्या कार्यालयामध्येच थाटला जाणार आहे. यामुळे तहसीलदारांना कर्मचाऱ्यांच्या कामावर नजर ठेवणेही सोयीचे ठरणार आहे. तसेच नागरिकांनाही सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

मनपाकडून सभागृहाची स्वच्छता

Advertisement

दोन दिवसांपूर्वी भूमी विभागामध्ये झालेल्या गैरकारभारामुळे भूमी विभाग चर्चेत आला आहे. यातच भूमी विभाग तहसीलदारांच्या कार्यालयात स्थलांतराचा निर्णय घेण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. जुन्या महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महानगरपालिकेची अनेक वर्षांपासूनची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. त्यामुळे सभागृहाला गोडाऊनचे स्वरूप आले होते. स्वच्छतेअभावी सभागृह धुळीने माखले होते. आता भूमी विभाग या सभागृहामध्ये सुरू करण्यात येणार असल्याने मनपाकडून सभागृहाची स्वच्छता करण्यात येत आहे.

कामात सुसूत्रता येण्यास मदत मिळणार

भूमी विभाग स्थलांतरित करण्यात येत असल्याने स्वच्छता करण्यात येत आहे. लवकरच हा विभाग जुन्या मनपामध्ये सुरू केला जाणार आहे. यामुळे कामात अधिक सुसूत्रता येण्यास मदत मिळणार आहे.

-तहसीलदार बसवराज नागराळ

Advertisement
Tags :

.