भूजल पातळी हळूहळू कमी होऊ लागली : भविष्यात गंभीर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ
युवराज पाटील /सांबरा
तालुक्यातील भूजल पातळी हळूहळू कमी होत चालली असून तलावदेखील कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यासाठी आतापासूनच जलसंवर्धन करणे गरजेचे बनले आहे. यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने तालुका व जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवलेले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. अशातच आता भूजल पातळीही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तर तालुक्यातील निम्मे तलाव कोरडे पडले असून इतर तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी जपून वापरणे गरजेचे बनले आहे.
दुष्काळाचे संकट लक्षात घेता जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील 25 जिह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. यावरूनच पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येते. तसेच जिह्यातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा, दूधगंगा, मार्कंडेय आदी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे. तर ग्रामीण भागातील तलाव आटू लागले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेसह शेतकरी वर्गावर होणार आहे. जनावरांना पाणी पाजण्यासह चाराटंचाई ही गंभीर समस्या बनणार आहे. तर भाजीपाला पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यातून रोगराई वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यासाठी याची गांभीर्याने दखल घेऊन आतापासूनच स्थानिक पातळीवर उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. पाणी जपून वापरणे व असलेल्या जलसाठ्याचे जतन करणे गरजेचे आहे. तालुक्यामध्ये भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात पिकविण्यात येतात. मात्र भाजीपाल्यासाठी पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे.