महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राच्या राजकारणाला गाय पट्ट्याची कळा!

05:35 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गलिच्छ राजकारण, गुन्हेगारी कृती आणि विरोधकांचा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन समाचार घेण्याची किंवा बंदोबस्त करण्याची वृत्ती हे गायपट्ट्यातील राजकारणाचे वैशिष्ट्या आता महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यातही खूपच वाढीस लागले आहे. त्याचे परिणाम अंतिमत: कोणाला भोगायला लागतात हे अकोला जिह्यात मृत्युमुखी पडलेल्या मनसे पदाधिकाऱ्याच्या दुर्घटनेनंतर समोर आले आहेच. पण, या पार्श्वभूमीवर होणारी विधानसभेची निवडणूक टोकाला पोहोचू नये याची खबरदारी आता नेत्यांनी घेण्याची गरज भासू लागली आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील काही भागातील जनता डोक्यावर दुष्काळाचे तर काही भागात महापुराचे सावट घेऊन वावरत आहे. दोन्हीकडे परिस्थिती टोकाची आहे. या परिस्थितीत लोकांना सरकार आणि विरोधकांकडून आधाराची आवश्यकता आहे. मात्र त्याच काळात या दोन्ही घटकांचे मात्र वेगळेच सुरू आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना विरोधकांना खोट्या गुह्यात आणि चौकशांमध्ये अडकवून जेलमध्ये दाबून ठेवण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप करत त्याबाबत संजय राऊत, अनिल देशमुख अशी काही उदाहरणे दिली.

Advertisement

चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी यापुढे आपल्या विचारांना साथ देणाऱ्या राजकीय पक्षांना म्हणजेच महाविकास आघाडीला साथ देण्याचे आवाहन पुरोगामी कार्यकर्त्यांच्या नागपूर येथील मेळाव्यात बोलताना केले. जसे श्याम मानव यांनी सरकारवर आरोप केले तसेच लोकसभेला आपण प्रचार करताना राजकीय टीका फार कमी करून महाराष्ट्रातील प्रबोधनाच्या ज्ञानेश्वर, नामदेव, तुकारामांपासूनचा वारकरी सांप्रदाय, महात्मा फुलेंची सत्यशोधक आणि प्रबोधनकार व इतर सुधारक, राष्ट्रसंतांच्या आणि स्वातंत्र्यानंतर संविधान निर्मितीच्या परंपरेवर लोकांची मते घडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या परंपरेतील कार्यकर्त्यांनी आपल्या या विचारासाठी निवडणूक प्रचारात उतरले पाहिजे आणि आपलाच विचार मांडत राजकीय मांडणी केली पाहिजे, ज्यांनी कार्यकर्त्यांना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या बुवाबाजी विरोधातील प्रयत्नांना साथ दिली नाही त्यामागची कारणे लक्षात घेऊन विरोध करण्याचे आवाहन केले. आमदार फुटी, न्यायालयाचे निकाल याबाबत त्यांनी परखड भाष्य केले.

वैशिष्ट्या म्हणजे श्याम मानव यांनी असा आरोप करून झाल्यानंतर काहीच दिवसात पोलीस महासंचालकांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा चांगल्या पद्धतीने अमलात येण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना कळवला आहे! त्यामुळे जाणत्या व्यक्तींनी विरोधाची पद्धत कशी अवलंबावी याचे श्याम मानव यांचे भाषण एक उत्तम नमुना म्हणता येईल. त्यांनी आरोप करायला आणि पोलीस महासंचालकांनी निर्णय घ्यायला एक गाठ पडली आहे हे मात्र निश्चित. तर इथूनच एक वेगळी सुरुवात ही झाली.

श्याम मानव यांच्यानंतर एका प्रसिद्ध युट्युबरशी बोलताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक मोठा खुलासा केला की, आपण गृहमंत्री असताना आणि अडचणीत आलो असताना यातून स्वत:च्या बचावासाठी गृहमंत्री देशमुख यांनी एक प्रतिज्ञापत्र द्यावे असा प्रस्ताव तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्याकरवी पाठवला. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, याशिवाय मंत्री अनिल परब यांच्या आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र देण्याचा मुद्दा होता असा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली. त्यानंतर याचा फडणवीस आणि कदम यांच्याकडून इन्कार करण्यात आला. नेमका त्यावेळी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपाचाही प्रकार सुरू झाला.

या प्रकाराने संतप्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका मेळाव्यात ‘एकतर तुम्ही राहाल किंवा मी’ असा इशारा देऊन टाकला. हा वाद वाढत चालला आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेले वक्तव्य, अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांच्याकडून झालेली टीका आणि त्याचा समाचार घेत आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेले उत्तर, त्यातून संतापून महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सैनिकांनी त्यांच्या गाडीची केलेली तोडफोड, त्यादरम्यानच्या धक्काबुक्कीत मार लागून जखमी झालेल्या शहर प्रमुखाचा झालेला मृत्यू त्यानंतर मिटकरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, मिटकरी यांचे पोलीस प्रमुखांच्या दारातील आंदोलन इथपर्यंत प्रकरण पेटले. सत्ताधाऱ्यांकडून संजय राऊत यांची कळ काढली जाताच त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. आज पर्यंत शरद पवारांना वडील मानणाऱ्या चित्रा वाघ यांनीही पवारांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्यांना युवक राष्ट्रवादीकडून तितक्यात चुकीचे प्रत्युत्तर देण्यात आले, हे सगळे किती काळ चालणार? राज ठाकरे राज्यातील सर्व नेत्यांवर बोलतात. कोणी राज ठाकरे यांच्यावर बोलले तर कार्यकर्त्यांनी एखाद्या आमदाराच्या गाडीवर धावून जावे का? याबाबत कार्यकर्त्यांना समजावण्याची गरज आहे.

मात्र नेते सुद्धा टोकाची भाषा करत असताना कार्यकर्ते खाली उच्छाद मांडू लागले तर ते थांबवणे नेत्यांच्या हातात राहणार नाही. विनाकारण दोन्ही बाजूचे युवा कार्यकर्ते तेवढे बळी पडतील. हे कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घेण्याची वेळ आली आहे. नेत्यांनीच ती वेळ आणली आहे. त्यामुळे हा खेळ कधीतरी आपल्यावरही उलटणार आहे याची जाणीव सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ठेवली तर लोकांना जुन्या काळातील नेत्यांचे आणि त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे दाखले द्यावे लागणार नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वच नेत्यांनी स्वत:ला सावरलेले बरे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article