For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कन्नड संघटनेकडून मनपासमोर धुडगूस

10:57 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
कन्नड संघटनेकडून मनपासमोर धुडगूस
Advertisement

अनगोळमधील जय महाराष्ट्र चौकचा फलक हटविण्याबाबत धिंगाणा

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहरासह सीमाभागाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. शहरामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक राहतात. सीमाभाग हा अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला आहे. पूर्वीपासून सर्वच व्यवहार मराठीतून होत आले आहेत. शहरातील विविध चौकांनाही मराठीच नावे आहेत. अनगोळ-भांदूर गल्ली येथील चौकाला ‘जय महाराष्ट्र चौक’ असे पूर्वीपासूनच म्हटले जाते. त्या ठिकाणी तसा फलक आहे. मात्र तो फलक हटवा म्हणून कन्नड संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर गुरुवारी धिंगाणा घातला. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून बाहेरून आलेल्या कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावात धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषिकांना लक्ष्य बनविण्यात येत आहे. व्यावसायिकांना वेठीस धरणे, असे प्रकार सुरू झाले आहेत.  याचबरोबर आता ज्या ठिकाणी मराठी नावांचा उल्लेख आहे त्याच चौकांचे नाव बदलावे किंवा तेथील फलक हटवावेत, अशी मागणी करत आहेत. केवळ जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शहरातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी सकाळी महानगरपालिकेसमोर 10 ते 12 कार्यकर्त्यांनी नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांचे लाड सुरू केले. त्यामुळे दिवसभर ते ठाण मांडून बसले होते. अनगोळ येथील तो फलक हटवावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हेकेखोरपणा करत ते कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून बसले होते. वास्तविक पोलिसांनी त्यांना धडा शिकवण्याची गरज असताना त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. हेच मराठी भाषिकांनी आंदोलन केले असते तर त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल करायचे, लाठीहल्ला करायचा, हे प्रकार घडले असते, अशी चर्चाही यावेळी सुरू होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.