For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुराचा विळखा, स्थलांतर सुरू

11:41 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुराचा विळखा  स्थलांतर सुरू
Advertisement

निपाणी, चिकोडी तालुक्यातील पूरग्रस्त 36 गावांना अलर्ट जारी : नद्यांच्या काठावर धास्ती : कृष्णेत 27 हजार क्युसेकने विसर्ग वाढला 

Advertisement

वार्ताहर /एकसंबा

कृष्णा, दूधगंगा व वेदगंगा नदीकाठावर पूरस्थितीमुळे नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार जैसे थे आहे. तसेच विविध धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गदेखील करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये भीतीची छाया पसरली आहे. रात्री-अपरात्री केंव्हाही पाणी येण्याची शक्यता असल्यामुळे पूररेषेतील कुटुंबीयांना तातडीने आवश्यक साहित्यासह सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. वाढती पाणीपातळी लक्षात घेता पूरग्रस्त भागात धडकी भरली आहे.

Advertisement

मुसळधार पाऊस, तसेच धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा व दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजापूर बंधाऱ्यातून 1 लाख 89 हजार 292 क्युसेक, दूधगंगा नदीतून 42 हजार 240 क्युसेक असे एकूण कल्लोळ कृष्णा नदीत 2 लाख 16 हजार 220 क्युसेक पाणी येत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 534.41 मीटर असून 0.3 मीटरने पाणी वाढले आहे. दूधगंगा नदीची पाणीपातळी 536.300 मीटर असून 0.42 मीटर पाणीपातळी वाढली आहे. पाण्याचा विस्तार वाढत असल्याने अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच सदलगा येथील दूधगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने सदर पुलावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे.

महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असून धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. परिणामी प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक, कण्हेर धरणातून 5 हजार 702 क्युसेक, वारणा धरणातून 15 हजार 785 क्युसेक, राधानगरी धरणातून 8 हजार 640 क्युसेक, काळम्मावाडी धरणातून 4 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर आलमट्टी धरणात 83.486 टीएमसी पाणी असून 516.92 मीटर इतकी पाणीपातळी आहे. धरणात 2 लाख 4 हजार 98 क्युसेक पाण्याची आवक होत असून 3 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने तसेच कोयना, राधानगरी आणि वारणा धरणातून विसर्ग वाढविल्याने कृष्णा नदीच्या पाण्यात मोठी वाढ अपेक्षित होती. पूरबाधित क्षेत्रात धोकादायक स्थिती असल्याने आलमट्टी धरणातून 2 लाख 75 हजार क्युसेकने होणारा विसर्ग सायंकाळी 7 वाजता वाढवून 3 लाख क्युसेक करण्याचे अधिकृत पत्रक आलमट्टी धरण प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात मात्र हा 3 लाख क्युसेकने विसर्ग झालाच नाही. सकाळच्या पूरस्थितीच्या माहिती पत्रकात 2 लाख 66 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे पूरस्थितीबाबत समन्वय होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी राजापूर बंधाऱ्यातून 23 हजार 958 क्युसेकने पाणी वाढले आहे. दूधगंगा नदीचा प्रवाह गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 3 हजार 520 क्युसेकने वाढला आहे. तर कल्लोळ कृष्णा नदीत शुक्रवारी 24 हजार 478 क्युसेक पाण्याचा प्रवाह वाढला आहे. कृष्णा नदीची धोका पातळी 537 मीटर आहे. इशारा पातळी 535 मीटर असून शुक्रवारची पातळी 534.41 मीटर होती. तर दूधगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळी 538 मीटर असून शुक्रवारची पातळी 536.030 मीटर इतकी होती.

चिकोडी, निपाणीत दमदार पाऊस

पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहता कोयना 198 मि.मी., वारणा 168 मि.मी., काळम्मावाडी 150 मि.मी., राधानगरी 234 मि.मी., पाटगाव 165 मि.मी., महाबळेश्वर 267 मि.मी., नवजा 172 मि.मी., पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी व निपाणी तालुक्यातील पावसाचे प्रमाण पाहता चिकोडी विभाग 50.2 मि.मी., अंकली विभाग 40.2 मि.मी., नगरमुन्नोळी विभाग 31.4 मि.मी., सदलगा विभाग 57.8 मि.मी., जोडट्टी विभाग 22.8 मि.मी., निपाणी पीडब्ल्यूडी विभाग 58 मि.मी., निपाणी 51 मि.मी., सौंदलगा विभाग 52 मि.मी., गळतगा विभागात 74 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

या गावांना अलर्ट जारी

चिकोडी व निपाणी तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा व चिकोत्रा या पाचही नद्या सध्या पात्राबाहेर गेल्या आहेत. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी नदी काठावरील अनेक गावांतील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे दोन्ही तालुक्यांना पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून चिकोडी व निपाणी तालुक्यातील 36 गावांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेऊन स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.