कांगारुंनी उडवला पाकचा धुव्वा
पहिली टी-20 : पाकिस्तान 29 धावांनी पराभूत, सामनावीर मॅक्सवेलची चमकदार कामगिरी
वृत्तसंस्था/ब्रिस्बेन
गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्याच टी-20 सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील 7 षटकांच्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानला 29 धावांनी लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 षटकांत 93 धावा करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. तर नंतर ऑसी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला. उभय संघातील दुसरा टी-20 सामना दि. 16 रोजी सिडनी येथे होईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला तो पावसामुळे विस्कळीत झाला, यामुळे सामना खूप उशिरा सुरु झाला आणि तो 7-7 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 7 षटकांत 4 गडी गमावून 93 धावा केल्या. सलामीवीर मॅथ्यू शॉर्ट 7, मॅकगर्क 9 हे दोघे स्वस्तात बाद झाले. यानंतर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने आक्रमक खेळताना 19 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारासह 43 धावा फटकावल्या. टीम डेव्हिड 10 धावा करुन माघारी परतला तर मार्क स्टोइनिसने 7 चेंडूत नाबाद 21 धावा करत संघाला 90 धावापर्यंत पोहोचवले.
पाकचा उडवला धुव्वा
पाकिस्तानी संघ 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला, तेव्हा अवघ्या 16 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. कर्णधार मोहम्मद रिझवान खातेही उघडू शकला नाही, तर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू बाबर आझम 3 धावा करत बाद झाला. इतर खेळाडूंनीही निराशा केल्यामुळे पाकला 9 बाद 64 धावापर्यंत मजल मारता आली. पाककडून अब्बास आफ्रिदीने सर्वाधिक 20 धावा केल्या. हसीबुल्लाह खानने 12 तर शाहीन आफ्रिदाने 11 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झेवियर बार्टलेट आणि नॅथन एलिस यांची भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्यात दोघांनी प्रत्येकी 3 विकेट घेत पाकचे कंबरडे मोडले. अॅडम झाम्पाने 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा तिसरा ‘दसहजारी’ फलंदाज
तडाखेबंद फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 43 धावांची खेळी करीत टी-20 क्रिकेटमध्ये 10000 धावांचा टप्पा पार केला. असा पराक्रम करणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज आहे. याआधी डेव्हिड वॉर्नर (12411 धावा) व अॅरोन फिंच (11458 धावा) यांनी हा पराक्रम केला आहे. हा टप्पा गाठणारा मॅक्सवेल हा एकूण 16 वा फलंदाज आहे. विंडीजचा ख्रिस गेल (463 सामन्यात 14562) आघाडीवर असून मॅक्सवेलने 448 सामन्यांतील 421 डावात 10031 धावा जमविल्या आहेत. त्यात 7 शतके व 54 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 154 ही त्याची या प्रकारातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 114 सामन्यांत 2643 धावा जमविताना सर्वाधिक 5 शतके नोंदवली आहेत. नाबाद 145 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 7 षटकांत 4 बाद 93 (ग्लेन मॅक्सवेल 43, टीम डेव्हिड 10, स्टोइनिस नाबाद 21, अब्बास आफ्रिदी 2 बळी). पाकिस्तान 7 षटकांत 9 बाद 64 (अब्बास आफ्रिदी नाबाद 20, शाहिन आफ्रिदी 11, बार्टलेट व एलिस प्रत्येकी तीन बळी).