काकोडा सेंट्रल बँकेचा घोटाळा वाढता वाढेच
वृद्धेला 20 लाखांना गंडविल्याची नवी तक्रार : तन्वी वस्त, आनंद गणपत जाधववर गुन्हा, लोकांना पैसे परत मिळण्याची लागलीय चिंता
कुडचडे : कुडचडेतील सेंट्रल बँक काकोडा शाखेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करून त्यांना फसविण्याच्या प्रकरणाची व्याप्ती भरपूर वाढण्याची शक्यता दिसत असून यासंदर्भात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. पोलिसस्थानकातून मिळालेल्या माहितीप्रमाणे 69 वर्षीय सुषमा अस्थाना यांना 20.29 लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी तन्वी वस्त आणि सेंट्रल बँक शाखेचे व्यवस्थापक आनंद गणपत जाधव याच्याविऊद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आणखी एक तक्रार आली असून बुधवारी कॉन्सेसांव फर्नांडिस, जे लंडनमध्ये आपल्या कुटुंब सोबत राहतात, त्यांनी तन्वी वस्तच्या विरोधात लेखी तक्रार करून एकूण 15 लाख 50 हजार रुपयांना लुटल्याचे नमूद केले आहे. कॉन्सेसाव फर्नांडिस यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योत बखले तपास करत आहेत. यात व्यवस्थापकाच्या व्यतिरिक्त अन्य बँक कर्मचारीही सामील आहेत का याची चौकशी होण्याची गरज लोकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. खातेधारकांना लुबाडल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारपासून बँकेच्या काकोडा शाखेत लोकांची गर्दी दिसून आली आहे.
पैसे परत मिळतील की नाही ?
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक काकोडा शाखेत खाते असलेल्या कित्येक लोकांच्या खात्यातील रक्कम दिशाभूल करून काढण्यात आली असून त्यांच्या हातात बँकेच्या नावाची बनावट कागदपत्रे सोपविण्यात आली आहेत. त्यातील काही लोकांनी बँकेत व कुडचडे पोलिसस्थानकात तक्रारी केल्या आहेत. या गौडबंगालात फसलेले काही सामान्य लोक भरपूर गोत्यात आले असून बँकेत तसेच पोलिसांत तक्रार दिलेली असली, तरी पैसे परत मिळण्याची शाश्वती नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यातच सरकारी स्तरावरून पोलिस कारवाईच्या व्यतिरिक्त लुटले गेलेले पैसे परत मिळवून देण्याची कोणतीच शाश्वती दिली गेली नसल्याने लोकांची भीती वाढली आहे. काहींचे लाखो ऊपये, तर काहींचे हजारो ऊपये लुटण्यात आल्याचे उघड झाले आहे व अशा प्रकारे आणखी किती जणांचे पैसे गायब झाले आहेत हे समजायचे बाकी आहे. त्यामुळे लुटले गेलेले पैसे खातेधारकांना परत मिळवून देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, असे मत लोकांनी व्यक्त केले आहे.
तन्वीचे मूळ नाव सेनी कुलासो
या प्रकरणात आतापर्यंत जी फसवणूक झाली आहे त्याचा फटका बसलेल्यांमध्ये बहुतेक ख्रिस्तीधर्मीय आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे या प्रकरणी अटक करण्यात आलेली तन्वी वस्त ही मूळची ख्रिस्तीधर्मीय आहे. ती मूळ मोरायले, कुडचडे येथील असून तिचे लग्नापूर्वीचे नाव सेनी कुलासो असे आहे. याच नावाने तिला लोक ओळखतात, अशी माहिती उघड झाली आहे. दरम्यान, प्रतिमा कुतिन्हो यांनीही कुडचडे पोलिसस्थानकाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.