Sangli : नांद्रे-सांगली रस्त्याचा प्रवास बनला जीवघेणा!
नांद्रे ते नावरसवाडी रस्ता दुरुस्तीची अपेक्षा; प्रवाशांना त्रास
नांदे : मिरज, तासगाव, पलूस, वाळवा आदी तालुक्यातील अनेक गावांचा जीवनदायी मार्ग असलेला नांद्रे-सांगली राज्यमार्ग अनेक तालुक्यांना जोडणारा आणि सर्वाधिक वर्दळीचा मार्ग सध्या नांद्रे ते नावरसवाडी पर्यंतचा रस्ता चाळण बनला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे, दुभंगलेला नावरसवाडी पूल यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. याचा वाहनचालक व प्रवाशांना त्रास होत आहे.
नांद्रे-सांगली १४२ राज्यमार्ग म्हणून ओळखला जातो. सांगलीची बाजार पेठ, साखर कारखाने, एमआयडिसी, कॉलेज, शाळा, व्यापार, व्यवसायशी जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवाशी, विद्यार्थी, व्यापारी, मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ असते. ग्रामदैवत पीर हजरत ख्यों जा कबीर दर्गा येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आपत्तीकालीन रूग्णवाहिकांनाही प्रवासात अडथळे येत आहेत. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू झाला असल्याने या मार्गावर वाहतूकीचे प्रमाण वाढले आहे, मात्र रस्ता रुंदीकरणासाठी साईट पट्टी ऊकरण्यात आली आहे. रस्त्यावरील डांबरी उखडून खड्ड्यांनी मार्ग व्यापला आहे.
यामुळे काही ठिकाणी रस्ता शोधावा लागतो आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार नोंदवली असली तरी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात कोणतेही काम दिसत नाही. प्रारंभी कामात दर्जा राखता न आल्याने हा रस्ता दयनीय स्थितीत आहे.
नांदतील धार्मिक सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. पीर हजरत ख्वॉजा कबीर यांचा उरूस व पंचकल्याणक महामहोत्सव होणार आहे. त्यामुळे तातडीने हा रस्ता पूर्ण करण्याची मागणी होत आहे.