For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्यापाराचा मुद्दा चर्चेत नव्हताच !

07:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
व्यापाराचा मुद्दा चर्चेत नव्हताच
Advertisement

ट्रम्प यांच्या विधानावर भारताचे पुन्हा स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र संघर्ष थांबविण्यास व्यापाराचा आणि करांचा मुद्दा कारणीभूत ठरला आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केले आहे. मात्र, भारतानेही पुन्हा या प्रतिपादनाचा इन्कार केला असून व्यापार किंवा व्यापारशुल्क यांच्यासंबंधीचा कोणताही मुद्दा चर्चे नव्हताच असे ठामपणे स्पष्ट केले आहे. भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

Advertisement

7 मे 2025 या दिवसापासून भारताने आपल्या ‘सिंदूर’ अभियानाचा प्रारंभ केला. तेव्हापासून नंतरच्या काळात केव्हाही अमेरिकेशी चर्चा झाली तेव्हा व्यापार किंवा व्यापारशुल्काचा मुद्दा चर्चेत आलेला नव्हता. 13 मे यादिवशी भारताने ही स्थिती स्पष्ट केली आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही यापूर्वीच हे वक्तव्य केले आहे. आज गुरुवारी आम्ही पुन्हा याच वक्तव्याचा आणि परिस्थितीचा पुनरुच्चार करीत आहोत, असे प्रतिपादन जयस्वाल यांनी केले.

पाकिस्तानचा प्रस्ताव आधी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव प्रथम पाकिस्तानने दिलेला होता. नंतर तो भारताने मान्य केला होता. अमेरिकेने या शस्त्रसंधीसाठी कोणतीही मध्यस्थी केलेली नाही. पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीला भारत कधीही भीक घालणार नाही, असेही रणधीर जयस्वाल यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.

सिंधू पाणी करार स्थगितच राहणार

पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादापासून मुक्त होणार नाही, तो पर्यंत सिंधू जलवितरण करार स्थगितच राहणार आहे, अशी स्पष्टोक्तीही जयस्वाल यांनी केली आहे. पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ यांनी भारताशी या कराराविषयी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, पाकिस्तान जो पर्यंत विश्वसनीयरित्या  दहशतवाद बंद करीत नाही आणि दहशतवादापासून कायमचा दूर जात नाही, तोपर्यंत या करारावर आम्ही पाकिस्तानशी कोणतीही चर्चा करणार नाही. ही भारताची ठाम भूमिका जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

दहशतवाद्यांना भारताकडे सोपवा

भारताने पाकिस्तानकडे तेथील दहशतवाद्यांची मागणी केली आहे. भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची सूची पाकिस्तानला देण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये हे दहशतवादी मोकळेपणाने फिरत आहेत. त्यांना त्वरित ताब्यात घेऊन आमच्या आधीन करावे, या मागणीचा पुनरुच्चार जयस्वाल यांनी केला.

पाकव्याप्त काश्मीर मुद्यावरही भाष्य

दहशतवाद आणि पाकिस्तानशी चर्चा या दोन्ही बाबी एकाचवेळी केल्या जाऊ शकत नाहीत. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरचा बेकायदेशीररित्या ताबा घेतलेला आहे. तो ताबा त्याने सोडला, तरच काश्मीरच्या मुद्द्यावर त्या देशाशी चर्चा केली जाऊ शकते. अन्यथा चर्चा केली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती जयस्वाल यांनी केली. ‘दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकाचवेळी होणार नाही तसेच, पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहणार नाही’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा पुनरुच्चार रणधीर जयस्वाल यांनी यावेळी केला.

Advertisement
Tags :

.