मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा दिल्ली दरबारी
काँग्रेसचे अध्यक्ष दिल्लीला रवाना : राहुल गांधींशी करणार चर्चा
बेंगळूर : राज्य काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतराच्या मुद्दा आता दिल्लीत हायकमांडच्या दारात पोहोचला आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील गोंधळ मिटविण्याच्या उद्देशाने बेंगळूरला आलेले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे मंगळवारी नवी दिल्लीला परतले. खर्गेंसोबत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विमानतळापर्यंत प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेंगळूरमध्ये राहून खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्र डी. के. शिवकुमार, मंत्री व आमदारांची मते जाणून घेतली. हायकमांडच यावर निर्णय घेईल, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेला गोंधळ तात्पुरता शमविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आता यासंबंधीचा अहवाल ते पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे सादर करतील.
कर्नाटकातील राजकीय घडामोडींची माहिती राहुल गांधी यांना देण्यासाठी ते मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाले. बुधवारी ते राहुल गांधींची भेट घेऊन सर्व बाबी निदर्शनास आणून देण्याची दाट शक्यता आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी आलेल्या उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्याशी काही वेळ चर्चा केली. तसेच खर्गे यांच्या कारमधूनच शिवकुमार यांनी सोबत विमानतळापर्यंत प्रवास केला. यावेळी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. सोमवारी शिवकुमार यांचे समर्थक दिल्लीला गेले आहेत. ते शिवकुमार यांच्यावतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. मागील आठवड्यात शिवकुमार यांनी दिल्लीत खर्गे यांची भेट घेतली होती. त्यानंतर खर्गे बेंगळूरला परतल्यानंतर लागलीच शिवकुमारांनी भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा उभयतांची भेट झाल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
हायकमांडने गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करावा : सिद्धरामय्या
हायकमांडने राज्य काँग्रेसमधील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. बेंगळूरमधील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथे नंदिनी ब्रॅण्डच्या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी जात असलेल्या वाहनाला शुभेच्छा दिल्यानंतर ते बोलत होते. पक्षात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी हायकमांडने निर्णय घ्यावा. आमदारांना त्यांचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. पक्षश्रेष्ठी काय सांगतात ते पाहुया, असेही ते म्हणाले.