कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न बनला गंभीर

10:42 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुक्या चाऱ्याचा दर गगनाला भिडणारा : बळीराजा संकटात : चारा उत्पादनासाठी पाणी देणे बनले कठीण 

Advertisement

वार्ताहर/किणये 

Advertisement

डोंगर भागातील वाळलेले गवत, भाताचे पिंजर, गव्हाचे काड व जोंधळ्याचा कडबा कापून साठवून त्याची गवत गंजी बनवून शेतकरी ठेवतात. या सुक्या चाऱ्याचा वापर शेतकरी हिवाळ्यात व उन्हाळ्यात जनावरांसाठी करतात. सध्या मात्र या सुक्या चाऱ्याचा दर गगनाला भिडणारा झाला आहे तसेच सध्या तालुक्याच्या अनेक गावांमध्ये सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. तालुक्यातील शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. या दुग्ध व्यवसायाकरिता बहुतांशी शेतकऱ्यांकडे एक दोन गाई, म्हशी आदींसह बैल व इतर जनावरे आहेत. या जनावरांना उन्हाळ्यात व हिवाळ्यात सुका चारा दिला जातो. गतवर्षी अतिवृष्टीमुळे भात पिकांचे अधिक प्रमाणात नुकसान झाले. यामुळे भाताचे पिंजर बहुतांशी शिवारात कमी आले. तसेच डोंगराळ भागातील गवत शेतकरी कापून घेऊन जातात. मात्र यंदा बहुतांश ठिकाणी डोंगराळ भागांना आग लागण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हे गवत शेतकऱ्यांना कापता आले नाही. त्यामुळे यंदा सुक्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे.

भात कापणीनंतर बहुतांश शेतकरी आपल्या शिवारात जोंधळ्याची पेरणी करतात. या जोंधळ्याची कणसे भरल्यानंतर शिल्लक राहिलेला जोंधळा कापणी करून त्याचा कडबा म्हणून सुका चारा म्हणून जनावरांना दिला जातो. मात्र हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलामुळे जोंधळा पीक खराब झाले. यामुळे जोंधळ्याचा कडबाही खराब झाला असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेत शिवारातील पिकांना कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, तर कधी बाजारभाव याचा सामना करावा लागतो. त्यामुळे शिवारात पिकासाठी केलेला खर्च बळीराजाला निघेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय त्यांच्या संसारासाठी हातभार लावणारा आहे.  गोठ्यात दोन-चार दुभत्या जनावरांपासून दर आठवड्याला दुधाचे पैसे मिळतात. त्यातून शेतकऱ्यांना लागणाऱ्या संसारोपयोगी साहित्य, बाजाराची खरेदी शेतकरी करीत असतात.

पावसाळ्यामध्ये या जनावरांना ओला चारा अधिक प्रमाणात दिला जातो. मात्र हिवाळ्यात व उन्हाळ्यात बहुतांशी प्रमाणात सुक्या चाऱ्यावरच जनावरे अवलंबून असतात. सध्या तीव्र उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यामुळे तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात भाजीपाला व अन्य पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. यामुळे जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी पाणी देणे मुश्किल झाले आहे, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली. भाताच्या एका पिंजराच्या ट्रॅक्टरला तीन ते सहा हजार इतका दर झालेला आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तसेच भाताचे पिंजर आणण्यासाठी ट्रॅक्टरला सुमारे 700 ते पंधराशे इतके भाडे द्यावे लागत आहे. हे भाडे शेतकऱ्याची सुक्या चाऱ्याची जागा व शिवारातून ट्रॅक्टरमधून पिंजर आणणे या अंतरावर हे भाडे अवलंबून आहे. तसेच एक ट्रॅक्टर भरण्यासाठी मजुरांना दोनशे ऊपये मजुरी द्यावी लागते. तर दिवसाला दोन ट्रॅक्टर पिंजर आणण्यात येते, अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. भाताच्या पिंजर आणण्यास ट्रॅक्टर भाडे व मजुरी यासाठी अधिक खर्च होऊ लागला आहे.

शेतकऱ्यांना प्रशासनाने मुबलक चारा उपलब्ध करावा!

तालुक्यातील बळीराजासाठी दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. जनावरांसाठी अधिक प्रमाणात सुका चारा लागतो. मात्र सध्या असलेला सुक्या चाऱ्याचा दर हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारा नाही. तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून काही शेतकरी कुट्टी वापरतात, मात्र 50 किलोच्या एका कुटीच्या पोत्याला पाचशे ऊपये इतका दर आहे. विकत सुका चारा घेऊन जनावरांचे पालन पोषण करणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. प्रशासनाकडून जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुबलक दरात सुका चारा उपलब्ध करून दिला पाहिजे. यासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना भेटून त्यांना सरकारच्या योजनांची माहिती देणे गरजेचे आहे.

- विनायक पाटील, कर्ले

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article