खानापूर तालुक्यात पावसाचा जोर ओसरला
हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री पुलावर पाच फूट पाणी, रस्ता वाहतुकीसाठी बंद
खानापूर : खानापूर तालुक्यात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारीही पावसाचा जोर ओसरला असला तरी दिवसभर संततधार सुरुच राहिल्याने तालुक्यातील नदी, नाल्यांची पातळी स्थिर आहे. तसेच हेम्माडगा रस्त्यावरील हलात्री नदीच्या पुलावर पाच फूट पाणी आल्याने गोव्याच्या वाहतुकीचा रस्ता बंद झाला आहे. सायंकाळी पावसाने पुन्हा जोर केल्याने शहरवासियांच्या मनात पुराची धास्ती लागून राहिली आहे. गेल्या दोन दिवसापासून मलप्रभा नदीची पाणीपातळी वाढल्याने शहर परिसरातील नागरिकांत पुराची धास्ती लागून राहिली असून 2020 च्या पुराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
जून महिन्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जुलै आणि ऑगष्ट महिन्यात जर पावसाने जोर केल्यास पुराचा धोका संभवतो. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार राहिल्याने जनजीवन ठप्प झाले आहे. बुधवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळल्याने तालुक्यातील जनजीवन ठप्प झाले आहे. सकाळी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती. तर सायंकाळी सहानंतर पावसाने पुन्हा जोर केला आहे. त्यामुळे पुन्हा नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही संततधार झालेल्या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला आहे.
दिवसभर संततधार सुरु असलेल्या पावसाने ग्रामीण भागातील नागरिकांनी खानापूर शहराकडे पाठ फिरविली आहे. होत असलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाण्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचण्याचे प्रकार सुरू असून शेतात जागोजागी खागी पडून पिकाचे मोठे नुकसान होत आहे. होत असलेल्या पावसामुळे भाताच्या (नट्टी) लागवडीवर आणि पेरलेल्या भाताच्या उगवणीवर तसेच उगवलेल्या भातावरही परिणाम होणार आहे. कणकुंबी, जांबोटी परिसरातही पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर सळखेवर पाऊस होत असल्याने पश्चिम भागातील जनजीवनावर परिणाम झालेला आहे.
सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाताहत झाली असून तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे डबक्याचे स्वरुप निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठी कसरत करून खानापूर गाठावे लागत आहे. अनेक गावच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन मे महिन्याच्या मध्यावर करण्यात आले. मात्र मे महिन्याच्या 15 तारखेपासूनच वळिवाच्या पावसाने सुरुवात केली. त्यानंतर मोसमी पाऊस सुरू झाल्याने रस्त्यांची कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडून डबक्याचे स्वरुप प्राप्त झाल्याने रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे.