डाव घोषित केला अन् पाकचा गेम झाला
23 वर्षानंतर बांगलादेशचा पाकिस्तानवर कसोटी विजय : शेवटच्या दिवशी नाट्यामयरित्या मारली बाजी
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानने आपला पहिला डाव घोषित केला आणि त्याचाच फटका त्यांना बसला. बांगलादेशला कमी लेखण्याची चूक पाकिस्तानने केली आणि त्यामुळेच त्यांच्यावर दारुण पराभवाच्या नामुष्कीची वेळ आली. बांगलादेशने या सर्व गोष्टींचा चांगला फायदा उचलला आणि त्यांनी ऐतिहासिक विजय साकारला.
बांगलादेशचा संघ 23 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे, पण आतापर्यंत बांगलादेशला पाकिस्तानवर कधीही कसोटी विजय मिळवता आला नव्हता. यंदा मात्र तब्बल 23 वर्षांनी त्यांना ही किमया साधता आली आहे. यावेळी बांगलादेशने फक्त विजय मिळवला नाही, तर आम्हाला कोणीही कमी लेखू नका असा इशाराही दिला आहे. अर्थात, बांगलादेशसाठी हा विजय खास आहे. पहिल्या डावात 191 धावांची खेळी साकारणाऱ्या बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, उभय संघातील दुसरी व शेवटची कसोटी दि. 30 पासून खेळवण्यात येईल.
डाव घोषित केला अन् गेम झाला
रावळपिंडी येथे झालेल्या उभय संघातील पहिल्या कसोटीत बांगलादेशने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पाककडून सौद शकील व मोहम्मद रिझवान यांनी दीडशतकी खेळी साकारली. या जोरावर पाकिस्तानने आपला पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकला डाव घोषित करण्याचा अतिआत्मविश्वास चांगलाच नडला. बांगलादेशने त्यांच्यावर पलटवार केला. मुशफिकुर रहीमच्या 191 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या डावात 565 धावांचा डोंगर उभारला. यामुळे बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची आघाडी घेता आली होती.
बांगलादेशच्या गोलंदाजांची कमाल
फलंदाजांनी चमक दाखवल्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात कमाल केली. मेहंदी हसन मिराज (4 बळी) व शकीब अल हसन (3 बळी) यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा दुसरा डाव 146 धावांवर आटोपला. मोहम्मद रिझवान (51) व अब्दुल शफीक (37) वगळता इतर पाक फलंदाजांनी सपशेल निराशा केली. यामुळे बांगलादेशला विजयासाठी फक्त 30 धावांची गरज होती. झाकीर हसन व इस्लाम या सलामीवीरांनी सहजपणे 30 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान पहिला डाव 6 बाद 448 डाव घोषित व दुसरा डाव 146
बांगलादेश पहिला डाव 565 व दुसरा डाव 6.3 षटकांत बिनबाद 30 (झाकीर हसन नाबाद 15, सदनान नाबाद 9).
बांगलादेशचा पहिला कसोटी विजय
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एकूण 13 कसोटी सामने खेळले गेले. पाकिस्तानने 12 कसोटी सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता, मात्र दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बांगलादेशने 14 वा कसोटी सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी साकारली आहे. विशेष म्हणजे, पाकवर ऐतिहासिक विजय मिळवण्यात बांगलादेशच्या संपूर्ण संघाचे मोठे योगदान राहिले.