अचानक संपली नव्हती सिंधू खोरे संस्कृती
गांधीनगर आयआयटीच्या वैज्ञानिकांचा दावा :
वृत्तसंस्था/ गांधीनगर
प्रगत, समृद्ध आणि अत्यंत रहस्यमय मानल्या जाणाऱ्या प्राचीन सिंधू खोरे संस्कृतीच्या खुणा भारत आणि पाकिस्तानात आढळून येतात. अखेर इतकी प्रगत संस्कृती गायब कशी झाली याचे रहस्य आजही कायम आहे. हडप्पा, मोंहेजोदडो, लोथल आणि राखीगढीपर्यंत या संस्कृतीचे नमुने आढळून आले आहेत. संस्कृतीच्या विलुप्त होण्यावरून अनेक प्रकारचे दावे करण्यात आले आहेत. यात महामारी, पूर, भूकंप आणि उल्कापात यासारख्या अनेक गोष्टी सांगण्यात येतात. आता आयआयटी गांधीनगरच्या वैज्ञानिकांनी दीर्घकाळापर्यंत दुष्काळाच्या प्रकोपामुळे ही संस्कृती नष्ट झाल्याचा दावा केला आहे.
सिंधू खोरे संस्कृतीला सिंधू-सरस्वती संस्कृती नावानेही ओळखले जाते. ही संस्कृती ख्रिस्तपूर्व 5000 ते 3500 ख्रिस्तपूर्व काळापर्यंत बहरली होती. ही संस्कृती स्वत:च्या शहरांसाठी ओळखली जाते. उत्खननात मिळालेले अवशेष आणि शहरांना पाहून पाण्याची निचरा करणारी प्रणाली आणि रस्ते किती प्रगत होते हे कळते. याचबरोबर या संस्कृतीतील लोकांना धातूच्या वापराचे ज्ञान होते. दैनंदिन वापरात मातीची भांडी सामील होती. या संस्कृतीचे लोक शेतीवर निर्भर होते आणि दीर्घकाळापर्यंत धान्य सुरक्षित ठेवणे जाणून होते.
आयआयटी गांधीनगरमध्sय विमल मिश्रा यांच्या नेतृत्वातील संशोधनात या संस्कृतीला सातत्याने दुष्काळाला तोंड द्यावे लागल्याचे दिसून आले. संस्कृतीचे पतन अचानक झाले नव्हते, तर ही हळूहळू समाप्त झाली. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक लोकांचा मृत्यु झाला आणि काहींनी पलायनही केल्याचा दावा 11 पानी संशोधन पत्रात करण्यात आला आहे.
सातत्याने दुष्काळ
सिंधू संस्कृती नदीवरच आधारित होती. नदीच्या पाण्याच्या मदतीने ते शेती करत होते. मान्सून आणि हवामानाच्या हालचालींमध्ये परिवर्तनामुळे पावसात 10-20 टक्क्यांची घट झ्ा़ाली होती. तर सरासरी तापमान 0.5 अंशानी वाढले. 85 वर्षांमध्ये कमीतकमी 4 अत्यंत तीव्र दुष्काळ पडले, एकदा तर 165 वर्षांचा दुष्काळ पडला आणि ज्यात संस्कृती नष्ट झाल्याचे म्हटले गेले आहे.
नद्यांमध्ये पाण्याची कमतरता
पाऊस कमी पडल्याने नद्या कोरड्या पडू लागल्या होत्या. आर्कियो बोटॅनिकल तथ्यांनुसार पाण्याच्या कमतरतेमुळे सिंधू संस्कृतीच्या लोकांनी गहू आणि अन्य धान्यांना सोडून देत इतर पिके घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अशयस्वी टरले. जुनी सरोवरे आणि गुहांच्या सर्वेक्षणातून या क्षेत्रात पाणी वेगाने कमी होत असल्याचे कळते. जवळपास दोन शतकांपर्यंत चाललेल्या दुष्काळामुळे पूर्ण संस्कृती हादरली, हळूहळू मोठी शहरे छोट्या नागरी वस्तीत रुपांतरित झाली.