‘फिडे’ महिला विश्वचषकात प्रथमच पाहायला मिळणार भारतीय विजेती
कोनेरू हम्पी व दिव्या देशमुखमध्ये अंतिम लढत, दोघीही कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र होण्यात यशस्वी
वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची विजेती पहिल्यांदाच भारतीय राहणार असून कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख येथे होणाऱ्या ग्रँड फिनालेमध्ये एकमेकांशी लढणार आहेत. स्पर्धेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे की, दोन भारतीय खेळाडूंमध्ये अंतिम फेरीत सामना रंगणार आहे. येथे अंतिम फेरी गाठल्यानंतर हम्पी आणि देशमुख या दोघीही पुढील वर्षीच्या महिला कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
मोठे सामने खेळण्याच्या निव्वळ अनुभवाच्या आधारे हम्पीचे पारडे अंतिम फेरीत देशमुखच्या तुलनेत जड भासते. गुऊवारी उपांत्य फेरीतील टायब्रेकरमध्ये चीनच्या टिंगजी लेईवर विजय मिळवताना हम्पीने स्वत:वर नियंत्रण ठेवले, तर देशमुखने शेवटच्या चार खेळाडूंच्या टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगयी टॅनचा पराभव केला. 38 वर्षीय ग्रँडमास्टर हम्पी ही जागतिक महिला रॅपिड स्पर्धेची विजेती बनली होती आणि अलीकडच्या काळात महिला ग्रांप्रीमध्येही तिने संयुक्तरीत्या प्रथम स्थान पटकावले होते.
हम्पीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, वय ही फक्त एक संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांत तिची जिद्द आणि दृढनिश्चय किंचितही कमी झालेला नाही. ‘बुद्धिबळ चाहत्यांसाठी हा सर्वांत आनंदाचा क्षण आहे. कारण आता विजेतेपद निश्चितच भारताकडे जाईल. अर्थातच एक खेळाडू म्हणून अंतिम सामनाही खूप कठीण असेल. कारण दिव्याने या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त खेळ केला आहे’, असे हम्पीने ‘फिडे’ वेबसाइटला सांगितले.
हम्पीच्या अर्ध्या वयाची असलेली आंतरराष्ट्रीय मास्टर देशमुखने या स्पर्धेत ‘टॉप टेन’मध्ये स्थान मिळवलेल्या तब्बल तीन खेळाडूंना आधीच धक्का दिला आहे. तिची पहिली बळी चीनची दुसरी मानांकित जिनर झू होती. त्याशिवाय तिने डी. हरिकाला बाहेर काढले. त्यानंतर नागपूरच्या 19 वर्षीय देशमुखने उपांत्य फेरीत माजी महिला विश्वविजेती चीनची झोंगयी टॅन हिला हरवले. ‘मला फक्त थोडी झोप आणि खायला काही तरी हवे आहे. हे दिवस माझ्यासाठी खूप चिंताजनक राहिलेले आहेत’, असे देशमुखने अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर सांगितले.
‘मला वाटते की, मी खूप चांगल्sं खेळू शकले असते. मी एका विशिष्ट टप्प्यावर जिंकत होते आणि नंतर परिस्थिती गुंतागुंतीची झाली. मला वाटते की, मी मधल्या खेळात चूक केली आणि मला आणखी सहज विजय मिळवायला हवा होता’, असे दिव्या तिच्या उपांत्य सामन्याबद्दल म्हणाली. ‘तिने (झोंगयी टॅन) एका विशिष्ट टप्प्यावर इतकी चांगली लढत दिली की, मला आता फक्त बरोबरी होईल अशी शंका यायला लागली होती. मला वाटते की, मी शेवटी भाग्यवान ठरले’, असेही ती म्हणाली.
हम्पीला प्री-क्वार्टरफायनलमध्ये माजी विश्वविजेत्या स्वित्झर्लंडच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियुकने टायब्रेकरपर्यंत ताणले आणि त्यानंतर तिने युक्सिन सॉन्गविऊद्ध निर्विवाद कामगिरी केली. मत्र आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी तिने उपांत्य फेरीसाठी राखीव ठेवली होती. 3-3 अशी बरोबरी झाल्यानंतर तिने पाच मिनिटांच्या गेममध्ये अव्वल मानांकित चीनच्या टिंगजी लेईला मागे टाकले. ‘मी रॅपिडमध्ये थोडी डळमळीत पद्धतीने खेळले, पण तिने खूप चांगली लढत दिली. सामन्याचा निकाल दोन्ही बाजूंनी जाऊ शकला असता’, असे हम्पी तिच्या उपांत्य सामन्यातील प्रतिस्पर्ध्याबद्दल म्हणाली. ‘सुऊवातीला मी काळ्या सोंगाट्या घेऊन खूपच वाईट खेळले आणि तिच्याकडे नेहमीच अनुकूलता होती. तिसऱ्या गेममधील पराभवानंतर परिस्थिती खूप कठीण होती, पण मी पुनरागमन करू शकले’, असे तिने सांगितले.
अंतिम सामना दोन क्लासिकल गेम्समध्ये खेळला जाईल आणि जर निकाल 1-1 असा राहिला. तर विजेता निश्चित करण्यासाठी कमी कालावधीचे गेम खेळले जातील. येथे दुसरे स्थान मिळविणाऱ्यास किमान 35000 डॉलर्सचे, तर विजेत्याला 50000 डॉलर्सचे बक्षीस मिळेल. हम्पीकडे चुका न करता दीर्घ खेळ खेळण्याची क्षमता आहे, तर दुसरीकडे देशमुखकडे आक्रमक शैली आहे. त्यामुळे ही अंतिम लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत.