भारतीय संघाने गोऱ्यांना दमवलं
लॉर्ड्स कसोटीतील पराभवाचे मणभर ओझं घेऊन भारतीय चमूचं वऱ्हाड पोहचले ते थेट मँचेस्टरला. हेच ते मैदान जिथे कोरोना काळात भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर असताना कोरोनाचे कारण सांगून कसोटी खेळण्यास नकार दिला होता. हेच ते मैदान जिथे सुनील गावसकरने आपल्या आयुष्यातील एक संस्मरणीय शतक ठोकले होते. आणि सरते शेवटी हेच ते मैदान जिथे भारतीय संघाच्या विजयाची पाटी कोरीच होती. आणि काल-परवाही ती कोरीच राहिली. ‘इलाका तुम्हारा लेकिन जीत हमारी’ ही टॅगलाईन घेऊन इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाला हा सामना अनिर्णीत राखण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्थात यात गिल, जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची कामगिरी पुढील काही वर्षं तरी आठवणीत राहील यात तीळमात्र शंका नाही.
पहिल्या तीन कसोटीत न्यूझीलंडच्या ब्रेंडन मेकॉलमने इंग्लंडच्या संघात बॅझबॉल क्रिकेटची जी संकल्पना रुजवली होती, ती कुठे लोप पावते की काय्। असं वाटत असतानाच गोऱ्यांनी थोडी आक्रमकता या कसोटीत दाखवली. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने पुरून उरले ते प्रथम गिल आणि त्यानंतर दोन डावखुरे जडेजा आणि सुंदर. क्रिकेटमध्ये डावखुऱ्याचं वेगळेपण काय असतं हे पुन्हा एकदा दिसून आलं. लँकेशायर काउंटी ग्राउंडचे हे मैदान गोलंदाज धार्जिणे. त्यातच भारतीय संघात अंशुल कंबोजला या कसोटीत अचानक लॉटरी लागली. परंतु या लॉटरीत विकेटरुपी येणारे पैसे मात्र त्याच्या खात्यात जमा झाले नाही. अॅसेट आणि लायबिलिटी यातला फरक कधीकधी मध्यमवर्गीय व्यक्तींना समजत नाही. परंतु भारतीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटप्रेमींना क्रिकेटमध्ये अॅसेट म्हणजे काय असतं हे दाखवून दिले ते शुभमन गिलने. एक दोन नव्हे तब्बल चार शतकं या मालिकेत. एकूण नऊ शतकांपैकी सहा शतकं गोऱ्यांविरुद्ध हे विशेष.
या सामन्यात गिलचे काही निर्णय चुकले हे आपल्याला मान्यच करावे लागतील. वॉशिंग्टन सुंदरला तब्बल 60 षटकानंतर गोलंदाजीस पाचारण करण्यात आलं, ही गोष्ट निश्चितच न पटणारी. परंतु ही उणीव दुसऱ्या डावात सुंदरला फलंदाजीत बढती देऊन भरून काढली. ते म्हणतात ना, देर आये दुरुस्त आये. लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर माझे मित्र संदेश चव्हाण जे सध्या महाराष्ट्र पोलीस क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा मला फोन आला होता. त्यावेळी आम्ही दोघेही भारतीय संघ कच्चा (सुमार दर्जाचा) दिसतोय या गोष्टीवर एकमत झालो. या पूर्ण मालिकेत जरी भारतीय संघाने एकदा 20 गडी बाद केले असतील तरी भारतीय गोलंदाजी काहीशी क्लब दर्जाची वाटली. दुसरीकडे यजमानांची परिस्थिती आपल्यापेक्षा काही वेगळी नव्हती.
असो. या सर्व गोष्टी असल्या तरी कालच्या जडेजा आणि सुंदरच्या खेळीला दाद द्यावीच लागेल. या दोघांनी यजमानांच्या विजयाच्या मनसुब्यावर नांगर फिरवला. या दोघांसमोर खरोखर बेन स्टोक्स हतबल दिसत होता. या दोघांचा खेळ बघून मला सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांची आठवण झाली. त्याकाळी ते असेच गोलंदाजांना पुरून उरायचे. कसोटी क्रिकेटमध्ये 20 गडी बाद केल्यानंतरच फक्त विजय मिळवता येतो, असं नसून कधी कधी अनिर्णीत सामन्यातसुद्धा फार मोठा विजय असतो, हे भारतीय संघाने काल दाखवून दिलं. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे सद्यस्थितीत खरी कसोटी म्हणजे काय, याचं उत्तर आपल्याला इंग्लंड दौऱ्याकडे बघून मिळालं असेल, एवढं मात्र निश्चित. एकंदरीत काय, सलग दोन कसोटीत गोऱ्यांना त्यांच्याच भूमीत मॅरेथॉन गोलंदाजी करण्यास भाग पाडत पूर्णत: दमवलं एवढं मात्र खरं!
-विजय बागायतकर