भारतीय संघाला विजयाची नितांत गरज
वृत्तसंस्था / होबार्ट
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत रविवारी येथे यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या भारतीय सेनेला आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. भारताला फलंदाजी सुधारणा आवश्यक आहे. दरम्यान या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा हुकमी वेगवान गोलंदाज हॅजलवूड खेळणार नसल्याने भारताला विजयाची संधी उपलब्ध आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत हॅजलवूडची गोलंदाजी भेदक आणि अचूक टप्प्यावर असल्याने भारतीय फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. भारतीय फलंदाज उत्तुंग फटके मारण्याच्या नादात झटपट बाद झाले. हॅजलवूडच्या गैरहजेरीचा भारतीय फलंदाजांना फायदा होवू शकेल. सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा याची फलंदाजी मात्र नेहमी प्रमाणे आक्रमक होत आहे. पण शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, यांना अधिक धावा जमवाव्या लागतील. हर्षित राणाकडून आक्रमक फटकेबाजी अपेक्षित आहे. होबार्टच्या मैदानाच्या सीमारेषा कमी असल्याने या मैदानावर फलंदाजांना चौकार, षटकार मारणे फारसे अवघड जाणार नाही. याच मैदानावर 2012 साली झालेल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने लंकेविरुद्ध 86 चेंडूत नाबाद 133 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघात तीफ फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाईल, असा अंदाज आहे. बुमराह समवेत कदाचित अर्शदीपला संधी मिळू शकेल. या सामन्यात बुमराह खेळणार किंवा नाही, याबाबत अद्याप निश्चित समजू शकले नाही. पण बुमराह खेळू शकला नाही तर अर्शदीपला अंतिम 11 खेळाळूंत निश्चितच संधी मिळेल.
चालु महिन्याच्या अखेरीस अॅशेस मालिकेला प्रारंभ होत असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हॅजलवूडला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तो टी-20 मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. बार्टलेट, इलिस किंवा अॅबॉट यांच्याकडे नव्या चेंडूची जबाबदारी राहील. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा राहील. या मालिकेतील आव्हान जीवंत ठेवण्यासाठी भारताला रविवारचा सामना जिंकावाच लागेल.
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षय पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, बुमराह, वरुण चक्रवती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग व वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), अॅबॉट, बार्टलेट, बर्डमन, टीम डेव्हीड, डवेर हुईस, इलिस, मॅक्स्वेल, हेड, इंग्लीस, कुहेनमन, ओवेन, फिलीपी, तन्वीर सांघा,शॉर्ट व स्टोईनिस.
वेळ : दुपारी 1.45 वाजता.