‘हायकोर्ट जिलेबी’चा प्रभाव
भारतातील प्रसिद्ध महानगरांमध्ये हैद्राबादचा समावेश आहे. या नगरात पहाण्यासारखी अनेक स्थाने आहेत. त्यामुळे नेहमी येथे देशोदेशींच्या पर्यटकांची वर्दळ असते. तथापि, या शहरात एक वस्तू अशी आहे, की जिची लोकप्रियता या ऐतिहासिक स्थळांपेक्षाही अधिक आहे. ती वस्तू आहे, येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात मिळणारी विशेष ‘जिलेबी’. ही जिलेबी खाण्यासाठी केवळ सर्वसामान्य माणसे किंवा वकीलच नव्हे, तर राजकीय नेते आणि न्यायाधीशही रांगेत उभे असलेले दिसून येतात. या जिलेबीचा स्वादच असा आहे, की एकदा ती चाखली, की दुसरी कोणतीही जिलेबी नको वाटते, असा अनेक लोकांचा अनुभव आहे.
अनेक दशकांपूर्वी या जिलेबीचा प्रारंभ उच्च न्यायालयाच्या परिसरात स्थापन करण्यात आलेल्या ‘जय मासीजा’ नामक केंद्रामध्ये झाला. त्यावेळी हे केंद्र अत्यंत लहान होते. काही कालावधीतच ती इतकी प्रसिद्ध झाली, की तिला ‘हायकोर्ट जिलेबी असे नामोनिधान प्राप्त झाले. ती आता हैद्राबादची ओळख बनली आहे.
या जिलेबीचा गोडपणा, कुरकुरीतपणा, टिकावूपणा आणि रुची अन्य कोणत्याही जिलेबीपेक्षा भिन्न आहे. तिचे हे भिन्नत्वच तिचे आकर्षण आहे. या केंद्रात या जिलेबीसह कचोरी, सामोसे, पाणीपुरी असे पदार्थही मिळतात. तथापि, लोकांना आकर्षण प्रामुख्याने या जिलेबीचेच असते. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत या केंद्रावर लोकांची भलीमोठी रांग लागलेली असते. ती संपल्यावर अनेक लोकांना रिकाम्या हातानेच घरी परतावे लागते. कित्येक लोकांनी त्यांच्या सकाळच्या न्याहारीत या जिलेबीला स्थान दिले आहे. या नगरात आलेला प्रत्येक पर्यटक ही जिलेबी चाखल्याशिवाय जात नाही. बाह्याभाग कुरकुरीत तर अंतर्भाग मऊसूत हे या जिलेबीचे विशेष वैशिष्ट्या आहे. तिची पाकसिद्धी करताना गूळ आणि केशर या पदार्थांचा उपयोग केलेला असतो. तेलात तळून, पाकात घोळून ती गरम असतानाच ग्राहकाच्या थाळीत वाढली जाते. तिचा कुरकुरीतपणा कित्येक दिवस टिकून राहतो. त्यामुळे ती बाहेरगावांमध्येही घेऊन जाणे शक्य होते. ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळत असली तरी, सकाळी लवकर जाऊन मागणी नोंद करावी लागते. संध्याकाळी सहा नंतर ती मिळत नाही. त्यामुळे दिवस उगवल्यापासूनच या केंद्रावर तिच्यासाठी खवय्यांची झुंबड उडालेली असते.
