मूर्ती लहान...किंमत महान
बाहुल्या या लहान मुलांना खेळण्यासाठी बनविल्या जातात, हे आपल्याला माहित आहे. पण केवळ लहानांसाठीच त्या बनविल्या जातात, असे नसून मोठ्यांसाठीच्या बाहुल्या देखील असतात. पण मुद्दा बाहुल्या कोणासाठी असतात हा नसून या बाहुल्यांची किंमत किती असू शकते, हा आहे. बाजारात सर्वसाधारणपणे 200 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंतच्या बाहुल्या उपलब्ध असल्याचे आपण पहातो. तथापि, हाँगकाँगचे एका कारागीर कासिंग लुंग यांनी एक अशी बाहुली बनविली आहे, की जिची किंमत आपल्या कल्पनेच्याही बाहेरची, म्हणजे सव्वा कोटी रुपये इतकी आहे. नुकताच या बाहुलीचा या किमतीला लिलाव करण्यात आला आहे.
या बाहुलीचे नाव ‘लाबुबू’ असे आहे. ती माणसाच्या आकाराची आहे. साधारणपणे सव्वाचार फूट उंचीच्या या बाहुलीचे स्वरुप एखाद्या राक्षसासारखे आहे. पॉप मार्ट नामक एका कंपनीने तिला बाजारात आणले होते. या बाहुलीत सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने तसे विषेश काहीही नाही. तथापि, हाँगकाँग आणि चीनमध्ये आज अशा बाहुल्या विकत घेण्याचे वेड इतके पसरले आहे, ती धनिक लोक वाटेल तितकी किंमत देऊन त्या विकत घेत आहेत. अशाच प्रकारे या बाहुलीचाही लिलाव होऊन इतकी प्रचंड रक्कम मिळाली आहे. यामागचे रहस्य या बाहुलीत नव्हे, तर तिच्या पॅकिंगमध्ये दडलेले आहे. हे पॅकिंग अशा प्रकारे केले जाते की आपण विकत घेतलेल्या बाहुलीचे स्वरुप नेमके कसे आहे, हे विकत घेणाऱ्याला समजत नाही. या रहस्यामुळेच त्यांची किंमत इतक्या प्रचंड प्रमाणात वाढते. या पॅकिंगला ‘ब्लाईंड बॉक्स फॉर्मट असे म्हणतात. अशा प्रकारे या बाहुल्यांचा लिलाव केला जातो. व्यवहारी भाषेत सांगायचे तर, हा शौकिन लोकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार म्हटला पाहिजे. पण लोक तसे बनण्यात राजी असतील तर बनविणारेही निर्माण होणारच. तर असा हा अजब प्रकार आहे.