‘सेकंड होम’ बनतेय गोव्याची ओळख!
‘सन, सँड अँड सी’ ठरले आता कालबाह्य : ‘बाई, बाटली, ड्रग्ज, जुगाराचा बोलबाला
पणजी : कधीकाळी ‘सन, सँड अँड सी’यासारख्या पर्यटनबहुल गोष्टींसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला गोवा आता या तिन्ही वैशिष्ट्यांमधून कधीच मागे पडला असून त्यांची जागा आता ‘बाई, बाटली, ड्रग्ज, जुगार, गुन्हेगारी’ यांनी घेतली आहे. तरीही काहीजणांसाठी तो ‘सेकंड होम’ साठी एक स्वस्त आणि मस्त ठिकाण म्हणुनही आवडू लागला आहे. उर्वरित सर्व आवडी, निवडी या ठराविक कालावधीसाठी महत्वपूर्ण ठरत असल्या तरी ‘सेकंड होम’ च्या भलत्याच आवडीतून गोवा लोकप्रिय ठरू लागला आहे. परंतु अशाप्रकारचे त्यांचे गोव्याबद्दलचे हे प्रेम, ओढ, आवड, हे सर्व प्रकार राज्यात जमीन व्यवहारात बेसुमार वाढ होण्यास कारणीभूत ठरू लागले आहेत. आता तर ही वाढ एवढ्या अतिरेकी स्तरावर पोहोचली आहे की तिला रोखणे कोणत्याही यंत्रणेसाठी अशक्यप्राय बनले आहे.
अर्धीअधिक लोकसंख्या नवगोमंतकीयांची
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ बनल्यापासून म्हणण्यापेक्षा त्याच्या पायाभरणीपासूनच पेडणे तालुक्यात जमिनींच्या विक्रीला बहर येऊ लागला होता. त्यातून मोठमोठ्या धनिकांनी तेथील जमिनी हातोहात खरेदी केल्या. यात दिल्लीतील बड्या प्रस्थांचा मोठा भरणा होता. त्याशिवाय राज्याच्या किनारपट्टी भागातील जमिनीही सोन्याच्या भावात विकल्या जाऊ लागल्या. त्यानंतर खरेदीदार राज्याच्या वाळपई, सांगे, काणकोण यासारख्या अंतर्गत भागांकडे वळू लागले. यातून विद्यमान स्थितीत अर्धेअधिक गाव आणि तेथील लोकवस्ती बिगर गोमंतकीयांनी व्यापलेली आहे.
जमिनींवर मध्यस्थांची ‘घारीची दृष्टी’
हे चक्र अद्याप थांबलेले नाही. आता तर बिल्डर लॉबीची वक्रदृष्टी येथील डोंगरांवर पडली असून अनेक डोंगर काँक्रीट जंगलात परावर्तीत झाले आहेत. जुने गोवेतील कदंब पठार, वास्कोतील दाबोळी पठार ही त्याची काही ज्वलंत उदाहरणे ठरावी. या व्यवसायातून केवळ खरेदीदारच गब्बर बनले असे नव्हे तर या व्यवहारात मध्यस्थी करणारेही महागब्बर बनले आहेत. हे मध्यस्थ अक्षरश: घारीच्या डोळ्यातून जमिनींचा शोध घेत असतात. एखादे सावज हेरले की त्याला ती जमीन विकण्यास भाग पाडेपर्यंत ते त्याचा पिच्छा पुरवतात.
‘नो मॅन्स लँड’ चीही परस्पर विक्री?
काहीजण ‘नो मॅन्स लँड’ चाही शोध घेत असतात. या प्रकारातून केवळ जमिनीच नव्हे तर वर्षांनुवर्षे विनावापर असलेली असंख्य घरे परस्पर विकण्याचेही धाडस अनेकांनी केले आहे. नुकत्याच राज्यात गाजलेल्या जमीन हडप प्रकरणातून हे सत्य समोर आले होते. सध्या विशेष एसआयटी मार्फत अशा प्रकरणांचा तपास सुरू आहे. त्यातून अनेकांना कैदेची हवाही खावी लागली.
गुंतवणूक शेअर बाजारापेक्षाही लाभदायक
जमीन खरेदीत केलेली गुंतवणूक ही शेअर बाजारातील नफ्यापेक्षाही कैक पटीनी खात्रीशीर आणि सुरक्षित. येथे झाला तर नफाच होतो, हा बाजार कधी गडगडत नाही. त्यामुळे शेकडो लोकांनी राज्यात कोट्यावधी चौरस मीटर जमिनी नुसत्याच खरेदी करून ठेवल्या आहेत. त्याच धर्तीवर काही जणांनी ‘सेकंड होम’ या गोंडस नावाखाली हजारो फ्लॅट, बंगले खरेदी करून ठेवले आहेत.
सिनेतारकांना तर गोवाच हवा
देशातील चित्रपटसृष्टी, क्रीडाक्षेत्र, व्यावसायिक यांच्याशी संबंधित किमान 80 टक्के बड्या हस्तींनी गोव्यात ‘प्रॉपर्टी’ खरेदी केल्या आहेत. त्याशिवाय पुणे, मुंबई सारख्या बड्या महानगरांचा वर्षानुवर्षांचा अनुभव घेतल्यानंतर ती शहरे सोडून गोव्यात स्थायिक होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. कारण त्या शहरातील स्वत:चा फ्लॅट एका कोटीत विकल्यास तेवढ्याच पैशांतून गोव्यात दोन फ्लॅट खरेदी करता येतात. नंतर त्यापैकी एक फ्लॅट भाडेपट्टीवर देऊन वरकमाईही करता येते. हे गणीत मांडूनही अनेकजण गोव्यात स्थायिक झालेले आहेत. या लोकांना खास करून येथील पोर्तुगीजकालीन हवेलीवजा घरांची आवड होती. पैकी अनेकजण अशी घरे मिळविण्यात यशस्वी, भाग्यवानही ठरले. खरेदी केल्यानंतर कोट्यावधींची अतिरिक्त गुंतवणूक करून अशा घरांना नवीन साज चढविण्यात आला. काहीजणांनी नंतर त्यांचा पार्ट्या आयोजन आदी व्यावसायिक कारणांसाठीही वापर केला. सध्या अशी घरे मिळणे दुर्मीळ बाब बनली आहे.
बड्या अधिकाऱ्यांच्या किनारी भागात वसाहती
राज्यात सरकारी खात्यांमध्ये सचिव आदी बड्या हुद्यांवर येणारे आयएएस, आयपीएस, आयएफएस या दर्जाचा जवळजवळ प्रत्येक अधिकारी तर आल्याआल्या प्रथम एखादी जमीन किंवा फ्लॅट खरेदी करत असतो. त्याही पुढे जाताना अनेक अधिकाऱ्यांनी काणकोणसारख्या तालुक्यात किनारी भागात स्वत:च्या वसाहतीच स्थापन केलेल्या आहेत, हेही सर्वश्रूत आहे. त्याशिवाय फार पूर्वी आलेल्या काही अधिकाऱ्यांनी मोठमोठ्या जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. आता त्यांची दुसरी पिढी त्या जमिनी विकसित, हातावेगळ्या करत आहेत, असाही प्रकार हल्लीच धारबांदोडा तालुक्यात उघडकीस आला आहे.
वकिलही जमीन व्यवसायात
अशाप्रकारे रातोरात भरभक्कम रक्कम हाती येत असल्याने अनेक वकिलही व्यवसायात उतरले आहेत. ‘माय क्लायंट इंटेंड टू पर्चेज...’ अशा शब्दांनी सुरू होणाऱ्या जाहिराती वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होत असतात. त्यांची संख्या पाहता राज्यात जमीन विक्री व्यवसाय कोणत्या पातळीवर पोहोचला आहे याची कल्पना येते.
फसवणुकीच्या प्रकारातही दिवसेदिवस वाढ
येथे नाण्याची एक बाजू गोंडस दिसत असली तरी दुसरी बाजू मात्र भयानक असल्याचे समोर आले आहे. प्रचंड मागणी असल्याने तोंडी येईल त्या भावाने जमिनी विकत असतानाच एखाद्या गरजवंताच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक होण्याचे प्रकारही घडत आहेत. पेडणेपासून काणकोणपर्यंत असे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आलेले आहेत.