चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या
देशात उद्या 10 राज्यातील 96 जागांवर मतदान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात 18व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होत आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले आहे. आता चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह 10 राज्यांतील 96 जागांवर सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी शनिवारी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता या क्षेत्रांमध्ये जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता रविवारी सायंकाळी निवडणूक अधिकारी आपापल्या केंद्रांवर दाखल झाल्यानंतर सोमवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ होईल. या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाच केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री, दोन क्रिकेटपटू आणि एका अभिनेत्यासह 1,717 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.
लोकसभा निवडणुकीचे 2024 चे तीन टप्पे 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी पूर्ण झाले आहेत. आता निवडणूक चौथ्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 13 मे रोजी आंध्रप्रदेशमधील सर्व 25 जागांवर मतदान होणार आहे. त्याव्यतिरिक्त बिहार 5, जम्मू-काश्मीर 1, झारखंड 4, मध्यप्रदेश 8, महाराष्ट्र 11, ओडिशा 4, तेलंगणा 17, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 8 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार महुआ मोईत्रा, पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा, बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गिरीराज सिंह, झारखंडमधील खुंटी मतदारसंघातून भाजपचे अर्जुन मुंडा, तेलंगणाच्या हैदराबाद मतदारसंघातून भाजपच्या माधवी लता आणि आंध्रप्रदेशच्या कडप्पा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार वाय. एस. शर्मिला अशा बड्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व 25 जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच बिहारमधील दरभंगा, उजियारपूर, समस्तीपूर, बेगुसराय आणि मुंगेर लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मध्यप्रदेशातील देवास, उज्जैन, मंदसौर, रतलाम, धार, इंदूर, खरगोन आणि खंडवा लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा 11 लोकसभा जागांसाठी लोक मतदान करणार आहेत. तेलंगणातील 17 लोकसभा जागांमध्ये आदिलाबाद, पे•ापल्ली, करीमनगर, निजामाबाद, झहीराबाद, मेडक, मलकाजगिरी, सिकंदराबाद, हैदराबाद, चेवेल्ला, महबूबनगर, नलगोंडा, नागरकुर्नूल, भुवनगिरी, वारंगल, महबूबाबाद आणि खम्मम या जागांचा समावेश आहे.
त्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर, खीरी, धौराहारा, सीतापूर, हरदोई, मिस्रिख, उन्नाव, फाऊखाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, अकबरपूर आणि बहराइच लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधील बहरामपूर, कृष्णनगर, राणाघाट, वर्धमान पूर्वा, वर्धमान-दुर्गापूर, आसनसोल, बोलपूर आणि बीरभूम अशा 8 जागांवर मतदान होणार आहे. झारखंडमधील सिंगभूम, खुंटी, लोहरदगा आणि पलामू या चार तर ओडिशाच्या कालाहंडी, नबरंगपूर (एसटी), बेरहामपूर आणि कोरापुट या चार जागांसाठीही मतदान होईल. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर लोकसभा जागेसाठीही सोमवारीच निवडणूक होणार आहे.