महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सह्याद्रीतील शिकारींचे प्रस्थ

06:30 AM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आपल्या देशात वन्यजीवांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी जे वेळोवेळी कायदे केलेले आहेत, त्याच्या अंतर्गत रानटी श्वापदांची शिकार हा गुन्हा मानून, त्यात गुंतलेल्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु असे असताना आजच्या घडीस जंगली प्राण्यांच्या मांसात चव, औषधी गुणधर्म, पौष्टिक तत्त्वे असल्याची धारणा असल्याकारणाने त्यांची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्याच्या कृत्यांत ठिकठिकाणी वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्याच आठवड्यात गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरती वसलेल्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्रात जंगली श्वापदांची वारंवार शिकार करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह तेथील वन खात्याने शिताफीने अटक करण्यात यश मिळविलेले आहे. गुंडा वनक्षेत्राच्या कक्षेत येणाऱ्या यल्लापूर वन विभागाच्या सीमेवरती वसलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या शिवापूर गावात शिकाऱ्यांच्या सदर टोळीकडून बिबट्याचे चार पंजे, सांबराचे मांस, धीवर पक्ष्याची चोच त्याचप्रमाणे दोन घोरपडीच्या कातडीसह बंदुका, जंगली श्वापदांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे तसेच गावठी बॉम्ब आणि दारूगोळा जप्त करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय वरदहस्ताद्वारे जंगली प्राण्यांची मांस, नखं, कातडी, दात, रक्त यासाठी शिकार करणाऱ्या पाच जणांना वन खात्याने अटक केलेली आहे.

Advertisement

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले काळी व्याघ्र राखीव क्षेत्र आणि त्याच्याशी संलग्न घनदाट जंगलात सापळे लावून अथवा बंदुकांद्वारे शिकारीच्या कृत्यात गुंतलेली ही टोळी काही वर्षांपासून येथील जंगली श्वापदांचा कर्दनकाळ ठरलेली होती. बऱ्याचदा त्यांना जेरबंद करण्यात वन खात्याला यापूर्वी अपयश आल्याने, यावेळेला कर्नाटकाच्या वन खात्याने सदर टोळीतल्या पाच जणांना अटक केलेली आहे. पूर्वाश्रमी दांडेली अभयारण्यात त्याचप्रमाणे अणशी राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या जंगलक्षेत्राचे रुपांतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या शिफारसीवरून कर्नाटक सरकारने 2007 साली अणशी दांडेली व्याघ्र क्षेत्राचे नामकरण 2015 साली काळी व्याघ्र राखीव क्षेत्र असे केले. सध्या काळी व्याघ्र राखीव क्षेत्रात 40 पट्टेरी वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाल्याने गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक सरकारच्या वन खात्याने येथील पट्टेरी वाघांचा अधिवास सुरक्षित राहावा, यासाठी कसोशीने प्रयत्नांची पराकाष्ठा आरंभलेली आहे परंतु जंगली श्वापदांचे मांस, शिंगे, नखं, कातडी आदींना मागणी असल्याकारणाने शिकाऱ्यांच्या टोळ्या या राखीव क्षेत्राच्या परिसरात सक्रिय आहेत.

Advertisement

जोयडा तालुक्यातल्या शिवापूर येथे शिकाऱ्यांना जेरबंद करण्यात आले होते, तो परिसर जंगल समृद्ध आहे. काळी व्याघ्र राखीव क्षेत्र गोव्यातल्या काणकोणातल्या खोतीगाव, सांगेतल्या नेत्रावळी, धारबांदोड्यातल्या महावीर आणि मोले आणि सत्तरीतल्या म्हादईच्या संरक्षित जंगलांशी संलग्न असून 1345 चौरस किलोमीटरचे काळी राखीव क्षेत्र आणि गोव्यातले संरक्षित वनक्षेत्र असा खरंतर सुमारे 2000 चौरस किलोमीटरचा पट्टा पट्टेरी वाघांच्या वास्तव्य, संचार, पैदासी यासाठी उपलब्ध झालेला असला तरी जंगली श्वापदांची मोठ्या प्रमाणात शिकार करणाऱ्या टोळ्या इथे सक्रिय आहेत. गोवा हे राज्य गुन्हेगारी प्रवृत्तींच्या टोळ्यांच्या वास्तव्याने यापूर्वीच बदनाम झालेले असून, यापूर्वी सापांचे विष, कातडी, त्याचप्रमाणे जीवंत सापांची आंतरराज्य तस्करी करणाऱ्यांना अटक केलेली आहे. घुमट, म्हादाळेसारख्या चर्मवाद्यांच्या निर्मितीसाठी गोव्यात घोरपडीच्या कातडीला जबरदस्त मागणी आणि त्याची सहज चलती असल्याने कर्नाटक, महाराष्ट्र राज्यांतून घोरपडीच्या कातडींची तस्करी बिनदिक्कतपणे होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. सत्तरीत 2019 साली ज्या चार वाघांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले होते, त्यावेळी त्या वाघांची नखं गायब झाली होती. 2009 साली रानडुक्कर, हरणासारख्या जनावरांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात वाघ अडकला, तेव्हा त्याला गोळी घालून ठार करण्यात आले होते. त्या वाघाची नखंडी गायब झाल्याची वार्ता होती.

महाराष्ट्रातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या उगाडे येथे जेव्हा बिबट्याच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते, तेव्हा त्याची नखं गायब करण्यात आली होती. तिळारीच्या खोऱ्यात तर गेल्या काही वर्षांपासून गवे रेडे, सांबर, रानडुक्कर आदी प्राण्यांची मांस, शिंगे, सुळ्यांसाठी निर्घृणपणे शिकार करण्याची प्रकरणे बऱ्याचदा उघडकीस आलेली आहेत. 2009 ते 2019 या दशकभरात गोव्यासारख्या छोट्या परंतु साक्षरतेच्या दृष्टीने अग्रक्रमी असलेल्या राज्यात अधिकृतरित्या पाच वाघांची हत्या केल्याची प्रकरणे उघडकीस आलेली असली तरी सांबर, चितळ, रानडुक्करासारख्या जंगली प्राण्यांसारखी पिसय, शेकरू, भेकरे, ससे आदींची शिकार केली जात असते. खरेतर मांसाहारीसाठी पाळीव प्राण्यांचे मांस सहजपणे उपलब्ध असताना काही मंडळींच्या जिभेचे चोचले पुरविण्याच्या हेतूने जंगली प्राण्यांची शिकार करून त्यांच्या मांसाचा पुरवठा हॉटेल व खवय्यांना करण्याचे षड्यंत्र व्यापक प्रमाणात चालू आहे, ही खेदजनक बाब आहे. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक वन खात्याने खानापूर तालुक्यातल्या नंदगड येथील काही लोकांना गव्यारेड्याचे मांस विकण्याच्या प्रयत्नांत असताना अटक केली होती. त्यांच्याकडून आठ किलो कच्चे तर सुमारे तीन किलो शिजविलेले गवा रेड्याचे मांस जप्त करण्यात आले होते. यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कर्नाटकातल्या वन खात्याने मध्य प्रदेशातील पट्टेरी वाघांची निर्घृणरित्या हत्या प्रकरणांत गुंतलेल्या चिक्का ऊर्फ कृष्णा पाटले पवार याला अटक केली होती. गेल्या वर्षी महाराष्ट्रातल्या एका पट्टेरी वाघाची आणि अस्वलाची हत्या प्रकरणात चिक्का गुंतल्याचा संशय होता. खानापूर परिसरातून चंदन लाकडाची होणारी तस्करी आणि जंगली श्वापदांच्या हत्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांशी चिक्का संबंधित आहे की काय? त्याविषयीची चौकशी वन खात्यामार्फत सुरू आहे.

यापूर्वी गुंजी येथील तीन व्यक्तींना दोन खवले मांजरांची शिकार करून, त्याच्या कवचांची तस्करी करण्याच्या प्रयत्नांत असताना अटक करण्यात आली होती. खानापूर, जोयडा, हल्याळ, शिरसी, यल्लापूर आदी भागांतल्या जंगलात खवले मांजरांची शिकार करणाऱ्या कवचांची विक्री केली जाते. गेल्या दशकभरात खवले मांजराची शिकार करून, त्यांचे मांस, कवचे विकण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या गुन्हेगारांना बऱ्याचवेळा पकडलेले आहे. जानेवारी 2023 मध्ये सावंतवाडी पोलिसांनी दोन शिकाऱ्यांना रानटी जनावरांची शिकार करण्याच्या प्रयत्नांत असताना अटक केली होती.  सह्याद्रीच्या जंगलक्षेत्रात जंगली श्वापदांची जी शिकार केली जात आहे, ती रोखण्यासाठी शिकार प्रतिबंध कृती दल मोक्याच्या ठिकाणी निरीक्षण मनोरे, तिन्ही राज्यांतील वन आणि पोलीस खात्यांबरोबर पर्यावरण आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या मदतीने संघटितरित्या आणि शिस्तबद्ध प्रयत्नांची नितांत गरज आहे. पट्टेरी वाघाच्या दृष्टीने कर्नाटकातील काळी व्याघ्र राखीव क्षेत्र आणि महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र शिकाऱ्यांच्या वक्रदृष्टीखाली आहे, त्यामुळे ही शिकारीची वाढती प्रकरणे थोपविण्यासाठी कसोशिने संघटित प्रयत्न झाले पाहिजे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article