ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या मोसमाचे वेध सुरू
संघांच्या अधिकृत जर्सीचे अनावरण, स्पर्धा लंडनमध्ये 3 ऑक्टोबरपासून
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या मोसमाचे वेध सुरू झाले असून बुधवारी नव्या मोसमासाठीच्या सर्व सहा संघांच्या अधिकृत जर्सींचे अनावरण करण्यात आले. ही लीग 3 ते 12 ऑक्टोबरदरम्यान लंडनमध्ये होणार आहे. अत्यंत यशस्वी 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडनंतर ही वैशिष्ट्यापूर्ण 10 दिवसीय बुद्धिबळ लीग शुभारंभी हंगामातील यशाचा स्तर यावेळी आणखी उंचावण्याचे उद्दिष्ट बाळगून असेल.
प्रत्येक संघाची जर्सी त्यांच्या भावनेचे प्रतिनिधीत्व करेल आणि लीगची जागतिक ख्याती दाखवेल अशा प्रकारे डिझाइन केली गेली आहे. अलीकडील बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदक विजेते खेळाडू आर. प्रज्ञानंद, विदित गुजराथी, अर्जुन एरिगेसी आणि आर. वैशाली यांच्यासह ग्लोबल चेस लीगमध्ये सहभागी होणारे आघाडीचे खेळाडू यावेळी आपापल्या संघाच्या जर्सी परिधान करून झळकले.
एकाच संघातून खेळल्यानंतर हे खेळाडू आपापल्या संघातर्फे एकमेकांशी भिडतील, ज्यामुळे जगभरातील चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. ग्लोबल चेस लीगच्या दुसऱ्या मोसमाला सुऊवात होण्यास फक्त एक आठवडा राहिला असून भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर निहाल सरिन हा पीबीजी अलास्कन नाईट्सतर्फे उतरणार आहे. त्याने आगामी स्पर्धेसाठी आपण उत्साही असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘गतवर्षीचा अनुभव विचारात घेता मी स्पर्धेत पुनरागमन करण्यास खूप उत्सुक आहे. सर्व अव्वल खेळाडूही यावर्षी खेळत आहेत आणि म्हणूनच मी लीगची वाट पाहत आहे’, असे निहालने म्हटले आहे. ग्लोबल चेस लीगने शुभारंभी मोसमातच त्याच्या अनोख्या सांघिक स्वरूपाद्वारे या खेळात जणू क्रांती घडवून आणली होती. अशा प्रकारच्या बुद्धिबळातील पहिल्या फ्रँचायझीवर आधारित या लीगमध्ये एकूण सहा संघ असून प्रत्येक संघात एक आयकॉन खेळाडू, दोन सुपरस्टार पुऊष खेळाडू, दोन सुपरस्टार महिला खेळाडू आणि एक प्रॉडिजी असे सहा खेळाडू आहेत.