मानवी मेंदूचा आकार वाढतोय...
प्रत्येक सजीवात सातत्याने उत्क्रांती होत आहे. मानवही या उत्क्रांतीला अपवाद नाही. मेंदू हा मानवाच्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. आपल्या प्रत्येक शारिरीक आणि बौद्धिक क्रियांचे नियंत्रण मेंदूकडे असते. एक प्रकारे तो आपल्या शरीराचा सम्राटच असतो. ही संपूर्ण नियंत्रण प्रक्रिया इतक्या सुरळीतपणे चाललेली असते की, आपल्याला तिची साधी जाणीवही कधी होत नाही.
अशा या सर्वतोपरी महत्वाच्या असणाऱ्या मानवी मेंदूची दिवसेंदिवस वाढ होत आहे, असा शोध शास्त्रज्ञांना लागला आहे. मानवाची निर्मिती एका उत्क्रांतीतूनच पृथ्वीवर साधारणत: 25 ते 50 लाख वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. त्यानंतर मानवाचे शरीर आणि बुद्धी यांच्यात सातत्याने आणि हळूहळू परिवर्तन होत गेले. या प्रक्रियेतूनच सांप्रतचा ‘बुद्धीमान मानव’ (होमो सेपियन) निर्माण झाला, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. मानव या स्थितीपर्यंत आल्यानंतर आता त्याच्या मेंदूची वाढ थांबली असेल तशी संशोधकांची समजूत होती. तथापि, ती चुकीची असल्याचे स्पष्ट करणारे आणखी एक महत्वाचे संशोधन समोर आले आहे.
यासंबंधी अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मोठे संशोधन होत आहे. सॅन अँटोनिओ येथील एका प्रसिद्ध संस्थेतील भारतीय वंशाच्या संशोधक सुधा शेषाद्री यांनी 2016 मध्ये या संशोधनाचा एक प्रबंध प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अनेक संशोधकांनी मानवी मेंदूसंबंधी निरीक्षणे नोंदविली आहेत. मानवी मेंदू हळूहळू मोठा होत आहे. याचाच अर्थ असा की, त्याच्यातील बुद्धीपेशींची संख्या वाढत आहे. साहजिकच मेंदूची क्षमताही वाढत असून याचे पर्यवसान माणसाचे कौशल्य आणि आयुष्य वाढण्यात होणार आहे. मेंदूची ही उत्क्रांती अशीच होत राहिली तर स्मृतीभ्रंशासारख्या गंभीर विकारांची तीव्रता कमी होऊन माणसाच्या मज्जासंस्थेला होणाऱ्या विकारांचा त्रास कमी होऊ शकतो. माणसाचे आयुष्यही वाढू शकते. आतापर्यंतच्या निरीक्षणांच्या अनुसार गेल्या 100 वर्षांमध्ये माणसाचे सरासरी आयुष्य जगभरात 7 ते 10 वर्षांनी वाढले आहे. या वाढीचा संबंध मेंदूच्या अजूनही होत असलेल्या उत्क्रांतीशी असावा, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.