For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घर बांधून देणार, दोषींवर कडक कारवाई

12:30 PM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
घर बांधून देणार  दोषींवर कडक कारवाई
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : जमिनदोस्त केलेल्या घराची केली पाहणी,मुख्य सचिवांना दिला चौकशीचा आदेश

Advertisement

पणजी : आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर जमिनदोस्त केल्याचे प्रकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने घेतले असून सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घराची पाहणी केल्यानंतर घोषणा केली की त्यांना त्यांचे घर बांधून दिले जाईल. त्याचबरोबर या प्रकरणाची कसून चौकशी होईल. चौकशी करण्याचा आदेश मुख्य सचिवांना दिला आहे. चौकशी अंती जे दोषी सापडतील, त्यापैकी कोणालाही सोडले जाणार नाही, ते मग वरिष्ठ पोलीस अधिकारीही का असेना, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आगरवाडेकर यांना घर बांधून दिले जाणार आहे, मात्र त्याचा खर्च हे घर ज्यांनी पाडले त्याच्याकडून वसून करुन घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्य सचिवांना चौकशीचा आदेश

Advertisement

कायद्याची बाजू काय आहे, तेही पाहण्यात येईल. मात्र असे गुंड घालून, जेसीबी वापरुन घर पाडणे योग्य नाही. अशी गुंडगिरी चालू देणार नाही. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी गुंतल्याचेही अनेकांनी म्हटले आहे, त्याचाही विचार करुन चौकशी करण्यात येईल. एकूण प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन अहवाल देण्याचा आदेश आपण मुख्य सचिवांना दिला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

मुख्य सचिवांकडून तपास सुरु

मुख्य सचिवांचा अहवाल आल्यानंतर सर्व संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. प्राथमिकत: याप्रकरणी 15 जण गुंतल्याचे दिसून आले असून या सर्वांवर कारवाई होईल. मुख्य सचिवांना आपल्या तपासकामाला सुरुवातही केली असून त्यांच्याकडून लवकरच अहवाल अपेक्षित आहे.

पूजा शर्मावर नोंदवणार गुन्हा

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या पूजा शर्मा या सध्या मुंबईत आहेत. त्यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात येईल. गुंडगिरी, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आपण येथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही, आपण आगरवाडेकर यांना न्याय देण्यासाठी आलो आहे. आगरवाडेकर गेल्या 25 वर्षापासून राहत आहेत, त्यांना न्याय देण्याची गरज आहे. याप्रकरणी आयपीएस अधिकारी गुंतला असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतही चौकशी होईल आणि कोणी दोषी आढळल्यास कायद्यात आहे, ती शिक्षा होईल. मात्र जोपर्यंत आपल्याकडे अहवाल येत नाही, तो पर्यंत आपण अधिक भाष्य करु शकत नाही.

अपहरणकर्त्यांवरही नोंदवणार गुन्हा

आगरवाडेकर पिता-पुत्राचे अपहरण करुन दुसऱ्या बाजूने त्यांचे घर मोडण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की जे कोणी या अपहरण प्रकरणात गुंतले आहेत, त्या सर्वांवर कारवाई होणारच आहे. आसगावात बिगर गोमंकीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात, त्यांना जागा गोमंतकीयांनीच दिलेली आहे. काहींनी स्वत:च्या जमिनी विकल्या तर काहींनी स्वत:ची घरे भाड्याने दिली आहेत, हे वास्तव आहे. मात्र या सऱ्या गोष्टी कायद्याचे पालन करुनच व्हायला हव्यात. गुंडगिरी चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून बजावले.

Advertisement
Tags :

.