महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सखी कक्ष’बाबत हॉस्पिटल कर्मचारीच अनभिज्ञ

10:40 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हॉस्पिटल प्रशासनाचे कर्मचारी, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांचे समुपदेशन आवश्यक : ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’चा हेतू सत्कारणी लागावा

Advertisement

मनीषा सुभेदार/बेळगाव

Advertisement

महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढत असताना सरकारने ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ सुरू केले. या अंतर्गत निर्भया हत्याकांडानंतर सिव्हिल  हॉस्पिटलमध्ये ‘सखी : वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणीही झाली. मात्र, या संदर्भात  हॉस्पिटलमधील परिचारिका, कर्मचारी आणि डॉक्टरांचेही समुपदेशन करण्याची आवश्यकता असून  हॉस्पिटलच्या कर्मचारीच ‘निर्भया कक्षा’बद्दल अनभिज्ञ आहेत.सदर प्रतिनिधीने गुरुवारी दुपारी सिव्हिल हॉस्पिटलमधील कॅज्युलिटीपासून तळमजल्यावर सर्व विभागांमध्ये सखी कक्षची चौकशी करता त्याबद्दल डॉक्टर, नर्स कोणालाच माहिती नव्हती. कॅज्युलिटी काऊंटरवरील व्यक्तीलासुद्धा त्याची माहिती नसल्याने

हॉस्पिटलचा फेरफटका मारता दुसऱ्या मजल्यावर सखी कक्ष असल्याची माहिती मिळाली. मात्र, हा कक्ष येथे आहे, हे कळण्यासाठी कोणतेही फलक किंवा मार्गदर्शक चिन्ह हॉस्पिटलमध्ये नसल्याने प्रथम सखी कक्ष शोधण्यातच वेळ वाया जात आहे. हॉस्पिटलचे बांधकाम केल्यानंतर सखी कक्ष दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आला. परंतु, दुर्दैवाने हा कक्ष येथे आहे, अशी माहिती त्या दरवाजाबाहेर नसल्याने नेमके कोठे जायचे, हे कळत नाही. ‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ किंवा सखी कक्ष हा पीडित महिलांना, मुलींना वेळेवर मदत मिळावी, यासाठी उभारला आहे. पीडित महिला किंवा मुलगी कॅज्युलिटीमध्ये आल्यानंतर तिला सखी कक्षात पाठविण्यात येते.

‘वन स्टॉप क्रायसिस सेंटर’ याचा अर्थच असा की, त्याच ठिकाणी पीडितेची वैद्यकीय तपासणी, तिला वकिलांकडून मार्गदर्शन व मदत, सामाजिक कार्यकर्त्यांकडून तिचे समुपदेशन, तिला जिल्हा प्रशासनाकडून किमान दहा हजार रु. आर्थिक मदत मिळावी. परंतु, या कक्षाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे हा कक्ष कोणत्याही परिस्थितीत कॅज्युलिटीच्या जवळ असणे आवश्यक आहे. दिल्लीतील निर्भया हत्याकांडानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा कक्ष 2019 मध्ये सुरू करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी माध्यम प्रतिनिधींनी त्याचे वृत्तांकनही केले होते. अलीकडच्या काळात हॉस्पिटलचे बांधकाम वाढल्यानंतर हा कक्ष वर हलविण्यात आला. समुपदेशकांनी सदर फलक लावला आहे, असे स्पष्ट केले. मात्र, हा फलक मुख्य इमारतीच्या मागील बाजूला लावला आहे.वास्तविक हा फलक दर्शनी भागात असायला हवा. मुख्य म्हणजे त्याबद्दल मार्गदर्शक चिन्हे लावणे आवश्यक आहे.

पीडित मुलगी किंवा स्त्राr हॉस्पिटलमध्ये आल्यास 

कॅज्युलिटी विभागामध्ये तिचे नाव नोंदवून घेतले जाते. परंतु, तिचे समुपदेशन, कायदेशीर मदत यासाठी तिला दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. पीडितेला जर जिने चढून जाणे अशक्य असेल तर तिने काय करावे, या प्रश्नाला कक्ष समुपदेशकांकडे उत्तर नव्हते. हा कक्ष कार्यरत निश्चितच आहे. वंटमुरी येथील पीडित महिलेला या कक्षाच्या सहकार्याने मदतही मिळाली आहे. परंतु, हा कक्ष येथे कार्यरत आहे, हे समजणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत सखी कक्ष तळमजल्यावर असणे आवश्यक आहे. पीडितेला पळापळ करावी लागू नये, तिला एकाच ठिकाणी मदत मिळावी, या हेतूने तो तळमजल्यावरच असला पाहिजे, अशी मागणी होत आहे. सखी कक्षाबद्दल हॉस्पिटल प्रशासनाने कर्मचारी, नर्सिंग स्टाफ आणि डॉक्टरांचे समुपदेशन करणे आवश्यक आहे.

कार्यवाही...

सदर सखी कक्ष महिला व बालकल्याण खात्याच्या अखत्यारित येतो. तो कार्यरत असल्याचे फलक ठळक अक्षरात लावू, असे महिला व बालकल्याण खात्याच्या उपसंचालकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

नागराज, उपसंचालक, महिला व बालकल्याण खाते.

‘कक्ष तळमजल्यावर आणून जागृती करू’ : बिम्सच्या कार्यकारी संचालकांची ग्वाही

यासंदर्भात बिम्सचे कार्यकारी संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांच्याशी संपर्क साधता त्यांनी सर्व बाजू शांतपणे ऐकून घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपल्या सूचना त्वरित अंमलात आणू, अशी ग्वाही दिली. अलीकडच्या काळात हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामानाने हॉस्पिटलला जागा अपुरी पडत आहे. यासंदर्भात सरकारला प्रस्ताव पाठविला असून तो लवकरच मंजूर होईल, अशी सुचिन्हे आहेत. दरम्यान, आपण पदभार स्वीकारल्यापासून सखी कक्ष पहिल्या मजल्यावरच आहे. याशिवाय फलक ठळक स्वरुपात न लावण्याचे कारण म्हणजे याबाबत पीडित किंवा शोषित महिला व मुलींच्या कुटुंबीयांचे समुपदेशन सुरू असताना कोणीही तेथे विनाकारण गलका करू नये किंवा निष्कारण सनसनाटी निर्माण होऊ नये, हा हेतू होता. तथापि, सखी कक्ष कार्यान्वित आहे, हे समजणे आवश्यक असून पीडितांचा विचार करून आपण पुन्हा हा कक्ष तळमजल्यावर कॅज्युलिटीच्या बाजूला सुरू करण्यास तयार आहोत. याशिवाय  हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे निश्चितपणे समुपदेशन करून त्यांना या कक्षाबद्दल आपण माहिती देऊ, अशी ग्वाही डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article