For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इतिहास शहराखाली दडलेल्या तळ्यांचा !

12:51 PM Jun 04, 2025 IST | Radhika Patil
इतिहास शहराखाली दडलेल्या तळ्यांचा
Advertisement

कोल्हापूर / सौरभ मुजुमदार :

Advertisement

अचानक आलेला अवकाळी पाऊस व त्यालाच जोडून हातात हात घेऊन आलेला मान्सून याने संपूर्ण जिह्यासह शहर पाणीमय करून टाकले आणि तळ्यांचे शहर म्हणून काही वर्षांपूर्वी संत महंत, इतिहास अभ्यासक आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या कोल्हापूरची आठवणीची पाने आपोआपच उलगडू लागली.

कोल्हापूर शहर । जसं विंचवाचं तळ।
वस्ती केली तुझ्यामुळं ।अंबाबाई ।।1।।
कोल्हापूर शहर। पाण्याच्या डबक्यात ।
फुलाच्या झुबक्यात। अंबाबाई ।।2 ।।

Advertisement

कित्येक वर्षांपूर्वी तळी आणि बागांच्या कुशीत वसलेलं कोल्हापूर. आज अनेक मुजवलेल्या तळ्dयांनी पुन्हा गतरूप प्राप्त केले आणि हे लक्षात आले. रंकाळा, पद्माळा, सिद्धाळा, वरूणतीर्थ, फिरंगाई, खंबाळे, रावणेश्वर, कोटीतीर्थ, सुसरबाव, महारतळे, कपीलतीर्थ, साकोली, कुंभार तळे अशी अनेक तळी, विविध कुंड आणि नैसर्गिक झऱ्यांच्या डबक्यांनी शहराला जणू जलदेवतेचा आशीर्वादच होता. परंतु कालांतराने शहर सुधारणेंतर्गत 1941 ते 1947 या काळात अनेक तळी आणि तलाव मुजवण्याचा विशेष कार्यक्रम कोल्हापूर नगर पालिकेने हातात घेतला.

त्या अंतर्गत सर्वप्रथम कपीलतीर्थ मुजवून ती जागा ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर इंद्रकुंड (बहुतेक महाद्वार रोडलगतचे) मुजवले. त्यानंतर महार तलाव मुजवून तेथे लक्ष्मीपुरी वसाहत केली. सुसरबाग तलाव मुजवून हरिहर विद्यालय सुरू झाले, गंगावेश येथील कुंभार तलाव मुजवून शाहू उद्यान केले. डमक मुजवूनही बाग करण्यात आली, पेटाळे तलाव मुजवून ती जागा न्यू एज्युकेशनला दिली. वरूणतीर्थ पहिल्या टप्प्यात पूर्णपणे कोरडे केले. 52 एकरांचा पद्माळा तलाव कोरडा करून शेतीखाली आणला. मस्कुती तलाव मुजवून वसाहत केली. रावणेश्वर तलाव मुजवून क्रीडांगण केले. अशा कैक तलाव आणि तळ्dयांना मुजवून त्यांचा समावेश विकासात केला गेला. परंतु काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची याच नैसर्गिक तलावांचा सुयोग्य वापर करून योग्य नियोजनाने कित्येक तलावांच्या काठाशी सुंदर, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक असे शहर वसवण्याची इच्छा होती, पण ती काही पूर्णत्वास गेली नाही. रिजन्सी कौन्सिलच्या मदतीने या समस्येवर कायमचा उपाय म्हणून ही तळी मुजवण्याचा कोल्हापूर नगरपालिकेने उपाय योजला.

वरूणतीर्थ तळ्याचे त्यावेळी नोंदवलेले क्षेत्र 10 एकर 15 गुंठे इतके विशाल होते. 4 सप्टेंबर 1943 रोजी हा भव्यदिव्य तलाव मुजवण्याचे काम सुरू झाले. याची सर्वसाधारण खोली दहा फूट खोल असल्याने सर्व प्राथमिक बाजू पाहता हा तलाव मुजवणे फार आव्हानात्मक, खर्चिक आणि बराच काळ लागणार, हे स्पष्ट होते. या तळ्याच्या दक्षिणेला पाणी आत येण्यासाठी दोन मोरी होत्या आणि उत्तरेला पाणी बाहेर काढणारी मोरी होती. दक्षिणेकडील या दोन मोरींपैकी पूर्व बाजूची मोरी आणि उत्तरेकडील मोरी सरळ रेषेने जोडून त्याच्या पूर्वेकडील सर्व भाग भरून घेण्याचा कालावधी जून 1944 निश्चित केला. ज्याला त्यावेळी 20 हजार रुपये खर्च व ज्यामुळे तीन एकर जागा उपलब्ध होईल, असे नियोजन करण्यात आले. तळ्dयाचा उत्तरेकडील रस्ता 25 ते 30 फुटांचा होता तो 100 फुटांचा करण्याचे ठरवले. त्यानंतर या तळ्याचा पूर्व-दक्षिण कोपऱ्याचा थोडा भाग न्यू एज्युकेशन सोसायटीला, पूर्व बाजूच्या थोड्या जागेत प्राथमिक शाळा आणि उर्वरित जागेत क्रीडांगण, रविवारचा बाजार, अथवा एखादे उद्यान करण्याचे निश्चित केले.त्यानंतर पेटाळा तलावही मुजवण्यात आला.

पेटाळा, वरूणतीर्थ तलावांचा भौगोलिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा

आज दिमडीभर जरी पाऊस झाला तरी शहराच्या मध्यवस्तीतील सिद्धाळा, पेटाळा, वरूणतीर्थ हा संपूर्ण परिसर क्षणात जलमय होऊन चिखल आणि दलदल पसरते. शेकडो विद्यार्थी, रहिवासी, पर्यटकांना जीव मुठीत घेऊनच संसर्गजन्य आजाराला दरवर्षी सामोरे जावे लागते. त्यामुळे हा प्रश्न कायमचा मिटवायचा असेल तर याच्या भौगोलिक इतिहासाचा पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. जुन्या कागदपत्रांवरून त्या संदर्भातील खालील माहिती उजेडात येते.

Advertisement
Tags :

.