हलशी येथील ऐतिहासिक यात्रोत्सवाला सुरुवात
यात्रा तीन दिवस चालणार : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह खळ्dयांच्या कुस्त्या
वार्ताहर/हलशी
येथील कदंबकालीन नृसिंहवराह यात्रोत्सावाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. भव्य रथातून कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात मिरवणूक काढून यात्रेची सुरुवात होणार असून, पुढे तीन दिवस यात्रा होणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह खळ्dयांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर विराजमान झालेले अति प्राचीन शहर म्हणजे हलशी. सभोवतालची पर्वतराई आणि गर्द हिरवी वनराई यांनी सजलेला हा प्राचीन कर्नाटक प्रांतीय कदंब अधिपती पलासी राज्याची हलशी ही राजधानी म्हणून 12 हजार गावांचा आधिपत्य गाजवणारा कदंबाच्या राजधानीत असंख्य मंदिरापैकी सर्वात मोठे व कदंब वास्तुशास्त्राचा विकसित नमुना असणारे मंदिर म्हणजे नृसिंहवराह मंदिर होय. जसे मंदिर विस्तृत तसाच परिसरही विस्तृत. मध्यवर्ती विस्तृत परिसरात कदंबाची किर्ती पताका फडकावित हे विष्णू मंदिर गेली 12 शतके उभे आहे. श्री भूवराह स्वयंभू लक्ष्मीनृसिंह मंदिराच्या समोरून प्रवेश करतानाच दृष्टीस पडतो, तो शिलालेख. इतिहासात जो हलशी शिलालेख म्हणून ओळखला जातो.
या शिलालेखानुसार बाराव्या शतकातील ‘परमादीदेव कदंब यांच्या विनंतीनुसार मठयोगी नावाच्या सत्पुरुषाने हे देवालय बांधून घेतले व श्री नृसिंह देवाची स्थापना केली. या मंदिराची पूजा कार्य त्यांच्याकडेच सुपूर्द केले. कदंब राजा तिसरा जयकेशी विजयादित्य कदंबाच्या सुपुत्राने नृसिंह देवासमोर वराह देवाची स्थापना केली. व मंदिराचे पूर्व प्रवेशद्वार बंद केले. तेव्हापासून मंदिराला 8×8 चौरस फूट आकाराची दोन गर्भगृहे 6×3 चौरस फूट मापाचे दोन देवड्या व मध्यभागी चौपट आकाराचे सभागृह आहे. एकूण पाच दालने मंदिराला असून पश्चिम गाभाऱ्यावर पिरॅमिड कृती गोपूर इतर मंदिरावर गच्चीसारखी छत आहे. देवडी व सभागृहाच्या बाहेरील बाजूने फरशीचे उतरते छत आहे.
मंदिराला चौफेर प्रदक्षिणा मार्ग असून चालुक्य बांधकाम पद्धतीचा प्रभाव या मंदिर बांधकामावर पडल्याचा दिसून येतो. आज हे मंदिर आणि परिसर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत असून पुरातत्व खात्याने बरेच संशोधनही केलेले आहे. तसेच पुरातत्व खात्याकडून अनेक मंदिराचे पुन्हा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे. याचवर्षी यात्रोत्सवात रथ ओढण्याची परंपरा प्राचीन असल्याने या ठिकाणी असलेला जुना रथ मोडकळीस आला होता. ग्रामस्थानी, भक्तानी, देवस्थान कमिटी आणि पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार नवा रथ तयार करण्यात आला असून यावर्षी या नव्या रथातून पारंपारिक रथोत्सव साजरा करण्यात येणार आहे.