Vari Pandharichi 2025: गोपाळपुरातील ऐतिहासिक मंदिर
पंढरपूर / चैतन्य उत्पात :
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर प्रमाणेच श्री क्षेत्र गोपाळपूर हे स्थान भाविकांना प्रिय आहे. आषाढी वारीमध्ये आलेला भाविक हा गोपाळपूर येथे जातोच, संत जनाबाई यांच्या महतीने गोपाळपूर स्थान पवित्र झाले आहे. संत जनाबाई यांचा संसार, जाते याठिकाणी आहे. पंढरपूरपासून दीड किलोमीटर अंतरावर गोपाळपूर येथील सुप्रसिद्ध मंदिर आहे.
तेराव्या शतकात जनाबाई होऊन गेल्या, त्या निस्सीम विठ्ठल भक्त होत्या, श्री संत नामदेव यांच्या घरी मोलकरीण म्हणून त्या काम करीत, त्यांच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आणि सुळावर देण्याची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, श्री पांडुरंग कृपेने सुळाचे पाणी झाले. मात्र, आरोपांनी व्यथित होऊन जनाबाई गोपाळपूर येथील मंदिरातील तळघरात रुसून जाऊन बसल्या. जनाबाई यांचा जन्म गंगाखेड येथे झाला होता. गोपाळपूर येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देतात जनाबाईचा संसार तसेच ज्या ठिकाणी सुळाचे पाणी झाले ती जागा पाहतात. आषाढी देवशयनी एकादशीनंतर पौर्णिमेदिवशी परतीच्या मार्गावर सर्व संताच्या पालख्या जाताना गोपाळपूर येथे गोपाळकाला साजरा केला जातो.यावेळी, गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला, असे म्हणून भाविक पंढरी नगरी सोडतात.