सर्वात उंच सेतू
ही पृथ्वी अनेक आश्चर्यांनी भरलेली आहे. काही आश्चर्ये नैसर्गिक आहेत, तर काही मानवनिर्मित आहेत. असेच एक मानवनिर्मिती आश्चर्य मलेशियात आहे. हा एक सेतू असून तो समुद्रसपाटीपासून तब्बल 2,170 फूट, अर्थात, 660 मीटर उंचीवर आहे. इतक्या उंचीवरचा तो जगातील एकमेव सेतू असल्याच बोलले जाते.
हा एक झुलता सेतू म्हणजेच सस्पेन्शन ब्रिज आहे. तो सर्वात अनोखाही असल्याचे मानण्यात येते. या सेतूवरुन निसर्गाचे अद्भुत दर्शन घडते, असे तेथे गेलेले पर्यटक सांगतात. हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक चमत्कार मानण्यात येतो. त्याला लँगकावी ब्रिज असे संबोधले जाते. या सेतूपर्यंत पोहचण्यासाठीही आपल्याला केबल कारचा आधार घ्यावा लागतो. या सेतूचा उपयोग वाहनांच्या वाहतुकीसाठी केला जात नाही. हा केवळ माणसांच्या पायी जाण्याचा मार्ग म्हणूनच उपयोगात आणला जातो. तो पाहण्यासाठी हजारो लोक मलेशियात येतात.
या सेतूची निर्मिती चाळीस वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. तो विशेषत्वाने पर्यटकांसाठी असून मलेशियाला पर्यटनासाठी जाणारी प्रत्येक व्यक्ती हा सेतू पाहिल्याशिवाय परत मायदेशी जात नाही, अशी याची ख्याती जगात पसरली आहे.