कॅम्पमधील हायस्ट्रीट होणार ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’
बेळगावातील 55 संघटना, मंडळांचे कॅन्टोन्मेंट बोर्डला पाठिंब्याचे पत्र
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डने काही दिवसांपूर्वी पॅम्प येथील हायस्ट्रीट रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा केली. परंतु, सदर निर्णयाला एका संघटनेने आक्षेप घेतला होता. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे असल्याने या रस्त्याला नामकरण करण्याचा कॅन्टोन्मेंटचा निर्णय योग्य असून या निर्णयाला बेळगावमधील अनेक संघटना, युवक मंडळे, सामाजिक संस्थांनी पाठिंब्याचे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डला दिले आहे. अनेक जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे कॅम्पमधील रस्त्यांना देण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून ही नावे अशीच होती. अखेर ही नावे बदलून त्या ठिकाणी देशासाठी योगदान दिलेले वीरपुरुष, तसेच हुतात्मा जवानांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला कॅन्टोन्मेंट बोर्ड मिटींगमध्ये मंजुरी देण्यात आली. तसेच आक्षेप नोंदविण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. परंतु, एका संघटनेने याला विरोध केला. त्यामुळे कॅन्टोन्मेंटने आक्षेप नोंदविण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली होती. या दरम्यान कोणत्याही संघटनेने नामकरणाला आक्षेप नोंदविला नाही. तर बेळगावमधील 55 हून अधिक गणेशोत्सव मंडळे, युवक मंडळे, शिवजयंती मंडळे, तसेच नगरसेवकांनी पाठिंब्याचे पत्र कॅन्टोन्मेंटला सुपूर्द केले. त्यामुळे आता कॅम्प येथील हायस्ट्रीट रोडच्या नामकरणाला पाठबळ मिळाले आहे. कॅन्टोन्मेंटचे अभियंता सतीश मण्णूरकर यांनी निवेदन स्वीकारले.
पाठिंब्यामुळे नामकरणाला पाठबळ
हायस्ट्रीटसह पॅन्टोन्मेंटमधील इतर रस्त्यांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मागील दोन वर्षांपासून नामकरणासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर हायस्ट्रीटला ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’ असे नामकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगावमधील अनेक गणेश मंडळे, शिवजयंती मंडळे, युवक मंडळे, तसेच नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे नामकरणाला पाठबळ मिळाले.
-सुधीर तुपेकर (पॅन्टोन्मेंटचे नामनिर्देशित सदस्य)