पोवाड्यातून ताराराणी यांची शौर्यगाथा
कोल्हापूर :
‘महाराणी होई बलशाही चौहू मुलखात नौबत झडली...’, हे स्फूर्ती गीत व ‘महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर असे महान ही शूरवीरांची खान..’ या पोवाड्याचे सादरीकरण करून शाहीर दिलीप सावंत यांनी परिसराचे लक्ष वेधून घेतले. डपावरील थाप आणि शाहीराच्या आवाजाने दसरा चौक परिसर दुमदुमला होता.
महाराणी ताराराणी यांच्या 350 व्या जयंती वर्षानिमित्त राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून ताराराणी यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे शाहू समाधी स्थळ येथे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी हा चित्ररथ शहरातील प्रमुख चौकात फिरला. दसरा चौकातून या फेरीला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी पोवाडा सादरीकरण करण्यात आले.
शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्यातून ताराराणीच्या पराक्रम गीताचे सादरीकरण केले. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कतृत्वावान आणि पराक्रमी स्त्री म्हणून ताराराणी होत्या, असेही सांगितले. तसेच महाराष्ट्रात कोल्हापूर ही शूरवीरांची खान असल्याचे आपल्या पोवाड्यातून सांगितले. त्यांना शाहीर तृप्ती सावंत यांनी सहकलाकार म्हणून साथ दिली. मारूती रणदिवे, रत्नाकर कांबळे, ढोलकीवादक किशोर सांगावकर यांनी साथसंगत केली. दसरा चौकातून येणारे-जाणारे लोक थांबून चित्ररथ पाहात होते. तर पाच मिनिट थांबून पोवाडा ऐकत होते. तसेच अनेकांना सेल्फी काढण्याचा व आपल्या मोबाईरच्या कॅमेरात चित्रबध्द करण्याचा मोह आवरला नाही. हा चित्ररथ दसरा चौकातून सीपीआरमार्गे गंगावेश येथे गेला तेथे रात्री उशिरापर्यंत होता. आज (दि. 15) पन्हाळा, वारणानगरला जाणार आहे. त्यानंतर कागल, हातकणंगले, शिरोळ असा कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवस फिरून मुंबईला रवाना होणार आहे.