For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवराजची वारसदार !

06:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
युवराजची वारसदार
Advertisement

भारतानं नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकाचे पडसाद लवकर विरणारे नाहीत...यात मोलाची भूमिका बजावलेल्यांमध्ये अग्रक्रमांक लागतो तो दीप्ती शर्माचा. तिच्या यंदाच्या स्पर्धेतील कामगिरीनं सर्वांना आठवण करून दिलीय ती 2011 सालच्या विश्वचषकात युवराज सिंगनं बजावलेल्या पराक्रमाची...अष्टपैलू या नात्यानं युवीचा वारसा सक्षमपणे चालविण्याची ताकद तिनं दाखवून दिलीय...

Advertisement

तिनं नुकत्याच झालेल्या विश्वचषकात 30.71 धावांच्या सरासरीनं फटकावल्या 215 धावा अन् 24.11 च्या सरासरीनं नऊ सामन्यांत पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला तो 22 फलंदाजांना...मग आठवण झाली ती 2011 मध्ये अशाच जबरदस्त अष्टपैलुत्वाची झलक दाखविणाऱ्या युवराज सिंगची...भारताच्या त्या फिरकी गोलंदाजानं बळी मिळविलेत ते सर्वांत जास्त. खेरीज ती ठरलीय एकदिवसीय आंतरराष्ट्रीय लढतींत 150 बळी खिशात घालणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू...तिनं एकदिवसीय सामन्यांत 2000 हून अधिक धावा जमविणाऱ्या व 150 बळी मिळविणाऱ्या निवडक महिलांच्या क्लबमध्ये सुद्धा प्रवेश केलाय...आग्राची ही मुलगी फलंदाजी करतेय ती डाव्या हातानं...तिच्या संयमानं नेहमीच काम केलंय ते भारताच्या मधल्या फळीला सावरण्याचं...एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली दीप्ती शर्मा...

घड्याळाचा काटा मध्यरात्रीच्या दिशेनं सरकतोय अन् सारा देश बुडालाय तो आनंदाच्या सागरात...गल्लीपासून अक्षरश: दिल्लीपर्यंत प्रारंभ झालाय जल्लोषाला...दीप्ती शर्माचा ‘फुलटॉस’ दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नादिन डी क्लर्कनं कर्णधार हरमीनप्रीत कौरच्या दिशेनं हाणला आणि भारतानं महिलांच्या एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा जिंकली...दीप्तीच्या गालावर आनंदाश्रू ओघळले नि क्षणार्धात साऱ्या संघानं तिच्यावर आक्रमणच केलं...या 28 वर्षांच्या फिरकी गोलंदाजी करणाऱ्या महिलेच्या यशाचं रहस्य कोणतं असा प्रश्न विचारल्यास नि:संशयपणे तिची जिद्द व निर्धार असंच उत्तर द्यावं लागेल. दीप्ती शर्मा बनलीय विश्वचषकाच्या एखाद्या सामन्यात अर्धशतक (58 धावा) फटकावणारी अन् पाच बळी मिळविणारी पहिलीवहिली महिला खेळाडू...

Advertisement

संयम आणि संतुलन यांचं स्पष्ट दर्शन घडत होतं ते दीप्ती फलंदाजी करताना. खेरीज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर टाकलेल्या 57 चेंडूंतून तिचा बाजी मारण्याचा हेतू पुरेपूर दिसून आला...खुद्द शर्माला देखील माहीत होतं की, विजय नि पराजय यांच्यामधील रेषा किती पुसट असते ती. त्याचा अनुभव तिनं दोन वेळा प्रकर्षानं घेतला...27 मार्च, 2022...न्यूझीलंडनं आयोजित केलेली स्पर्धा. ख्राईस्टचर्चमधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळतानाच शेवटच्या षटकात प्रतिस्पर्ध्यांना गरज होती ती सहा धावांची. दीप्तीनं पहिल्या चार चेंडूंत एका वाईडसह चार धावाच दिल्या, परंतु शेवटचा चेंडू ‘नो बॉल’ झाल्यामुळं साऱ्या मेहनतीवर पाणी पडलं...त्यापूर्वी 2017 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ती बाद होणारी शेवटून दुसरी फलंदाज होती. भारत इंग्लंडविरुद्धच्या त्या लढतीत हरला अवघ्या नऊ धावांनी...

आता मात्र तिनं सर्वांना दर्शन घडविलंय ते अप्रतिम आत्मविश्वास व चिकाटीचं. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही लपलेलं नाहीये. कारण वयाच्या नवव्या वर्षी हातात क्रिकेटची बॅट पकडल्यानंतर तिनं तेच तर केलंय...तिचा भाऊ सुमित शर्माला देखील क्रिकेटच्या वेडानं पछाडलं हातं. दीप्ती ही अन्य पाच भावंडांचा विचार केल्यास सर्वांत लहान. तिनंही आग्राच्या मैदानावर जाण्यास प्रारंभ केला आणि तिथं थडकणारी, क्रिकेटचा ध्यास घेतलेली ती एकमेव मुलगी होती. तिचे केस मुलाप्रमाणं असल्यानं बहुतेक लोक फसायचे. दीप्ती शर्मावर टोमणे व टीका यांचा सातत्यानं वर्षाव झाला. पण ती अजिबात खचली नाही...

वडील भगवान रेल्वेत कर्मचारी, तर आई शिक्षिका. त्यांना दीप्तीचं क्रिकेटचं वेड अजिबात मान्य नव्हतं. पण तिनं पाहिलेल्या स्वप्नापुढं त्यांच्यावर पाळी आली ती हात टेकण्याची. मग तिला प्रत्येकाकडून मिळालं ते समर्थनच. विशेष म्हणजे भावानं दीप्ती शर्माचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेट नोकरी सुद्धा सोडली...तिच्याकडे सर्वप्रथम लक्ष गेलं ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीच्या तत्कालीन अध्यक्षा हेमलता यांचं. त्या आग्रामधील एकलव्य क्रीडा स्टेडियमवर दीप्ती खेळत असताना उपस्थित होत्या. त्यावेळी तिची निवड उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघात करण्यात आली नाही. कारण निवड समितीला वाटलं ती वरिष्ठ स्तरावर खेळण्याइतपत प्रगल्भ झालेली नाहीये...

पण निराश न होता दीप्तीनं वेळेचा वापर केला तो कुशलतेला अधिक धारदार बनविण्यासाठी. खेरीज मध्यमगती गोलंदाजी करणारी ही खेळाडू वळली ती ऑफस्पिनच्या दिशेनं. दीप्ती शर्मानं फलंदाजीवरही लक्ष केंद्रीत करण्यास प्रारंभ केला. ती उत्तर प्रदेशच्या 19 वर्षांखालील संघातून चार वर्षं खेळली आणि भारताच्या ‘अ’ संघात प्रवेश करण्याची संधी देखील तिला मिळाली. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ चमूत स्थान मिळण्यापूर्वीच तिच्या वाट्याला भारतीय संघातील जागा आली...

वर्ष 2014...दीप्तीनं दक्षिण आफ्रिकेच्याच ‘अ’ संघाविरुद्ध भारत ‘अ’तर्फे पदार्पण केलं ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर. त्यानंतर लगेच एका वर्षानं 2015 साली बेंगळूर इथंच तिला भारताच्या वरिष्ठ संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली...काही महिन्यांनी दीप्ती शर्मानं उ•ाण केलं ते भारतीय संघातर्फे खेळण्यासाठी सिडनीच्या दिशेनं...त्यानंतरच्या कालावधीत तिनं सातत्यपूर्ण कामगिरीचं दर्शन घडविलंय. त्यात समावेश 2017 साली आयर्लंडविरुद्ध 160 चेंडूंत काढलेल्या घणघाती 180 धावांचा. दीप्ती व पूनम राऊतनं प्रथम यष्टीसाठी भागीदारी केली ती 320 धावांची...शिवाय इंग्लंडविरुद्धच्या 2023 सालच्या कसोटी सामन्यात तिनं 5 बळी खिशात घातले होते ते अवघ्या 7 धावांत...अशा या जिगरबाज मुलीच्या शब्दांत सांगायचं झाल्यास तिला नेहमीच आवडतात ती आव्हानं...कितीही कठीण असली तरी  !

‘मिस डिपेंडेबल’...

  • आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देण्याकामी भारताला मोलाची मदत करताना ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल दीप्ती शर्माचं अभिनंदन करणाऱ्यांत समावेश राहिला तो उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) राजीव कृष्णा यांचाही. कारण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘कुशल खिलाडी’ योजनेच्या अंतर्गत ‘डीएसपी’ या नात्यानं ती उत्तर प्रदेश पोलिसांचं प्रतिनिधीत्व करतेय...
  • दीप्ती शर्मा ही जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती एका विश्वचषक स्पर्धेत 200 पेक्षा जास्त धावा करणारी आणि 20 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी पहिली खेळाडू बनलीय. हा विक्रम महिला सोडाच पुरुष खेळाडूंना देखील नोंदविता आलेला नाहीये...
  • 24 ऑगस्ट, 1997 रोजी आग्रा, उत्तर प्रदेश इथं जन्मलेली दीप्ती डावखुरी फलंदाज असली, तरी ती ऑफब्रेक गोलंदाजी करते उजव्या हातानं. गेल्या काही वर्षांत ‘टीम इंडिया’साठी सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी ती एक. दीप्ती एक हुशार ऑफस्पिनर असून जवळजवळ कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करण्याची ताकद ही तिची खासियत...
  • शर्मानं किशोरवयातच वरिष्ठ स्तरावरील स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली. अष्टपैलू खेळाडू म्हणून तिनं अनेक मोलाचे टप्पे गाठलेत. उदाहरणार्थ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1000 धावा आणि 100 बळींचा विक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला...
  • विश्वचषकाच्या बाद फेरीत 50 धावा जमविणारी अन् पाच बळीही टिपणारी ती पहिली खेळाडू...
  • 36 बळींसह दीप्ती आता महिला विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलीय. तिच्या पुढं आहे ती फक्त झुलन गोस्वामी (43 बळी)...
  • भारताच्या निवड समितीच्या माजी प्रमुख नीतू डेव्हिड यांच्यापेक्षा शर्माला जास्त चांगलं कुणी ओळखत नाही. तिला मोठं होताना पाहिलेली ही माजी डावखुरी फिरकी गोलंदाज म्हणते की, क्रिकेट खेळायला सुऊवात केल्यानंतर तिनं मी, हेमलता काला, नुशिन अल खादीर आणि मिथाली राज यासारख्या अनेक भारतीय खेळाडूंसोबत भरपूर सराव केला. कदाचित यामुळं तिला खूप लहान वयात प्रौढ होण्यास मदत झाली...

- राजू प्रभू

Advertisement
Tags :

.