Satara : विश्वासघाताचा कळस! वृद्धेला बेशुद्ध करून केअरटेकरने केल्या सोन्याच्या बांगड्या लंपास
साताऱ्यातील फसवे ‘इंजेक्शन’ प्रकरण उघडकीस; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा : पंधरा वर्षांपासून केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या महिलेनेच विश्वासघात करून एका वृद्ध महिलेस ‘संधिवाताचे इंजेक्शन’ सांगून प्रत्यक्षात शुगर कमी होणारे इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे.
वृद्ध महिला बेशुद्ध पडल्यावर तिच्या हातातील सुमारे ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणला असून, चोरी केलेला सोन्याचा ऐवज, वापरलेले वाहन अशा मिळून सुमारे ७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
साताऱ्यातील गुरुवार पेठ परिसरात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेकडे आरोपी महिला सुमारे १५ वर्षांपासून केअरटेकर म्हणून ये-जा करत होती. दि. १४ ऑक्टोबर रोजी ती नेहमीप्रमाणे मालिशसाठी आली होती. मालिश झाल्यानंतर तिने वृद्ध महिलेस “संधिवाताचे इंजेक्शन आहे, त्यामुळे फरक पडेल” असे सांगून इंजेक्शन दिले. काही वेळातच ती महिला बेशुद्ध पडली. नातेवाईकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दोन दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर तिने सांगितले की, इंजेक्शन दिल्यानंतर चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली आणि बांगड्या कुठे गेल्या हे आठवत नाही.
तपासात उघड
वृद्ध महिलेच्या तक्रारीनंतर सातारा शहर पोलीसांनी तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राजीव नवले आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित महिलेस ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने गुन्हा नाकारला, मात्र तांत्रिक पुरावे आणि चौकशीतून उघड झाले की तिने शुगर कमी करणारे इंजेक्शन देऊन वृद्धेला बेशुद्ध केले आणि साथीदाराच्या मदतीने सोन्याच्या बांगड्या चोरल्या.
आरोपी आणि जप्त मुद्देमाल
या गुन्ह्यातील आरोपी जहिरा रफिक शेख (वय ५०, रा. प्रतापगंज पेठ, राधिका चौक, सातारा) शैलेश हरिभाऊ साळुंखे (वय ४९, रा. २२१, गुरुवार पेठ, सातारा) पोलीसांनी या दोघांना अटक करून चोरी केलेल्या ५ तोळे सोन्याच्या बांगड्या आणि वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास सुरू असून, आरोपींनी यापूर्वी अशा स्वरूपाचे अन्य गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
जनतेस आवाहन
पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरी केअरटेकर नेमण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करावी, तसेच वृद्ध व्यक्तींनी अंगावर मौल्यवान दागिने ठेवू नयेत. वृद्ध व्यक्ती एकट्या राहत असल्यास त्यांच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.
पोलिसांचा सन्मान
हा क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल वरिष्ठांनी डी.बी. पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्याम काळे, पो.उ.नि. सुधीर मोरे, पो.हवा. सुजीत भोसले, सतीश मोरे, निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.