स्थितप्रज्ञ योग्याचे अंत:करण अत्यंत शीतल असते
अध्याय दुसरा
अर्जुनाने भगवंताना विचारले, हे केशवा! अखंड समाधीत राहणाऱ्या स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? स्थिरबुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो? कसा असतो? आणि कर्म कसे करतो? कसा वागतो? कसा राहतो? हे कृपा करून मला सांगा. उत्तरादाखल भगवंत म्हणाले, अर्जुना जो मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा सोडून देतो व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो, त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ म्हणतात. माणसाच्या मनामध्ये विषयाबद्दल असलेले अत्यंत प्रेम त्याला आत्मानंदाचा अनुभव घेण्यापासून दूर करते. स्थितप्रज्ञाचे मन दु:खात उद्विग्न होत नाही तसेच त्याला सुखाची लालसा नसते. त्याच्या अंत:करणातून काम, क्रोध आणि भय निघून गेलेले असते. ह्या अर्थाचा
नसे दु:खात उद्वेग सुखाची लालसा नसे । नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित-प्रज्ञ संयमी ।। 56 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार सामान्य माणसाला त्रास देणारे काम, क्रोध आणि भय हे विकार स्थितप्रज्ञ योग्याला मात्र त्रास देत नसतात, कारण तो स्वत:ला कर्ता समजत नसल्याने जे ईश्वराकडून मिळेल त्यात तो समाधानी असतो. त्यामुळे त्याला कसल्याच इच्छा होत नसतात. तो कसल्याच दु:खद प्रसंगाना भीत नसल्याने, ते टळून सुख प्राप्त व्हावे असे त्याला कधी वाटत नाही. पूर्वकर्मानुसार सुख, दु:ख हे जीवनात आलटून पालटून येत असतात हे तो जाणून असतो. अंत:करण विश्वचैतन्याशी एकरूप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो.
माणसाच्या मनातल्या इच्छा कधी थांबत नाहीत. मला आता सर्व मिळालंय आणखी काहीही नको असे कधी त्याला वाटत नाही, एक पूर्ण झाली की, दुसरी इच्छा त्याच्या मनात कायम तयारच असते. किमान आत्ता आहे त्यात काही कमी न होता, आहे तसेच रहावे असे तरी त्याला नक्कीच वाटत असते. स्थितप्रज्ञाला मात्र इच्छा, द्वेष, सुख, दु:ख हे विकार त्रास देत नसल्याने त्याला कसलेच आकर्षण वाटत नसते. अमुक एक गोष्ट मला मिळावी असे कधी त्याला वाटत नसते. त्यामुळे शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता त्याला आनंद किंवा विषाद होत नसल्याने, त्याची बुद्धी स्थिर असते.
भगवंत पुढे म्हणाले, ज्याचे मन कशात गुंतलेले नसते तो स्थितप्रज्ञ असतो. त्याला काही मिळाले असता उल्हासही वाटत नाही किंवा अमुक एक मिळाले नाही म्हणून रागही येत नाही.
सर्वत्र जो अनासक्त बरे वाईट लाभता । न उल्लासे न संतापे त्याची प्रज्ञा स्थिरावली ।। 57 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, स्थितप्रज्ञ योग्याची तुलना पौर्णिमेच्या चंद्राबरोबर करता येईल. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश अत्यंत शीतल असतो. तो देताना चंद्र कोणताही भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ योग्याचे अंत:करण अत्यंत शीतल असल्याने तो सदा, सगळ्यांवर प्रेमाचा वर्षाव करत असतो. सर्व भूतमात्राविषयी अखंड दयाळू भाव त्याच्या मनात असतो. त्यामुळे त्याचे चित्त कायम शुद्ध असते. काही चांगले प्राप्त झाले तर आनंद व वाईट गोष्ट प्राप्त झाल्यामुळे तो खिन्न होत नाही.
याप्रमाणे जो हर्षशोक रहित असतो व नेहमी आत्मानुभुती संपन्न असतो त्याला स्थिरबुद्धी म्हणतात. हे त्याला कशामुळे साध्य होते असे विचारशील तर ज्याप्रमाणे कासव आपले अवयव सर्व बाजुंनी आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढुन घेते, त्याप्रमाणे तो पुरुष त्याची इंद्रिये, विषयापासून आवरून धरतो. विषयांचे आकर्षण संपल्यामुळे त्याला कुणाकडून कसल्याही अपेक्षा उरलेल्या नसतात.
क्रमश: