डोक्यावरून टिप्पर गेल्याने मुख्याध्यापक जागीच ठार
संतप्त नागरिकांकडून रास्तारोको : अपघातस्थळी अंत्यसंस्कार करण्याचा इशारा
कारवार : टिप्पर डोक्यावरून गेल्याने मुख्याध्यापक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी येथील केएसआरटीसी डेपोजवळ हब्बुवाडा रस्त्यावर घडली. दुर्दैवी मुख्याध्यापकाचे नाव उमेश गुणगी (वय 53, रा. किन्नर, ता. कारवार) असे असून ते कारवार तालुक्यातील देवळमक्की येथील सरकारी प्राथमिक शाळेत सेवा बजावित होते. अपघातानंतर शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि व्यवस्थेच्या विरोधात निदर्शने केली. अवैज्ञानिकरित्या केलेल्या रस्ता कामामुळेच मुख्याध्यापकांचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी काही तास रास्तारोको आंदोलन छेडले. लोकोपयोगी खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि रस्ता बांधकाम ठेकेदार घटनास्थळी दाखल झाल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी ठाम भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. इतकेच नव्हेतर मुख्याध्यापकांच्या मृत्यूला जबाबदार असलेले घटनास्थळी आले नाहीत तर मुख्याध्यापकांवर अपघातस्थळीच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नागरिकांनी दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. कारवारचे डीवायएसपी व्हॅलेंटाईन डिसोझा स्वत: परिस्थितीवर नजर ठेवून होते. त्यांनी नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला. तथापि, नागरिक त्यांचे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे घटनास्थळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण होते.
मुख्याध्यापक उमेश गुणगी यांनी आपल्या वडिलांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि आपल्या दुचाकीवरून शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी देवळमक्कीला निघाले होते. त्यावेळी येथील केएसआरटीसी डेपोजवळील हब्बुवाडा रस्त्यावर डिव्हाईडर उभारणीसाठी सोडण्यात आलेल्या जागेवर ते तोल जाऊन पडले. त्यावेळी अतिवेगाने निघालेल्या टिप्परचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले आणि जागीच ठार झाले. हब्बुवाडा येथे काँक्रीट रस्ता एक वर्षापूर्वीच तयार करण्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध डिव्हाईडर उभारण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे. तथापि अद्यापही डिव्हाईडरचे काम पूर्ण झालेले नाही. या समस्येकडे येथील जनतेने संबंधिताचे लक्ष वेधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला आहे. तथापि व्यवस्थेला जाग आली नाही. आणि शेवटी एका मुख्याध्यापकाचा बळी गेला. शेवटी गुणगी यांचा मृतदेह विच्छेदनासाठी हलविण्यात आला. टिप्परच्या चालकाला ताब्यात घेऊन कारवार ट्रॅफिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आमदार, मंत्री सत्कार करून घेण्यात मग्न...
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना प्रशांत सावंत म्हणाले, येथील आमदार, मंत्री सत्कार करून घेण्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात करावळी उत्सवाबद्दल चर्चा करण्यात वेळ घालवित आहेत. त्यांना रस्त्याच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सर्वजण वृत्तपत्रे आणि टीव्हीवर झळकण्यात धन्यता मानतात. सरकारी यंत्रणा विकासाच्या नावाखाली कर गोळा करतात. वेळेत कर भरला नाही तर व्याज आकारतात. आश्वासनांची पूर्तता करावी लागते याचा विसर सर्वांना पडला, असे पुढे सावंत यांनी सांगितले.