हमास सरकारचा प्रमुखही हल्ल्यात ठार
इस्रायलकडून घोषणा, तीन महिन्यांपूर्वीची कारवाई, नव्या हल्ल्यात 15 हिजबुल्ला हस्तक ठार
वृत्तसंस्था / जेरुसलेम
गाझा पट्टीतील हमास सरकारचा प्रमुख राव्ही मुश्ताहा याला 3 महिन्यांपूर्वीच एका वायुहल्ल्यात ठार करण्यात आले होते, अशी घोषणा इस्रालयकडून करण्यात आली आहे. भूमीखाली निर्माण करण्यात आलेल्या एका घरात तो असताना त्याला टिपण्यात आले, असे इस्रायली संरक्षक दलाने स्पष्ट केले आहे. तीन महिन्यांपूर्वीच्या या घटनेची घोषणा इस्रायलने गुरुवारी केल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारे इस्रायलने हमासच्या सर्व वरिष्ठ म्होरक्यांचा खात्मा केला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लावरही इस्रायलने हल्ले सुरुच ठेवले असून गुरुवारी केलेल्या वायुहल्ल्यात हिजबुल्लाचे 15 हस्तक ठार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुश्ताफा याच्यासमवेत आणखी दोन म्होरक्यांनाही ठार करण्यात आले होते. यासाठी इस्रायलने बंकर्सभेदी बाँबचा उपयोग केला होता. युद्धविमानांमधून हा बाँब टाकण्यात आला होता. त्याने अचूक लक्ष्यभेद केल्याने हे तिघेही एकाच वेळी आणि एकाच स्थानी मारले गेले, अशी माहितीही देण्यात आली आहे.
नावेही केली घोषित
इस्रायल सुरक्षा दल आणि इस्रायल सुरक्षा प्राधिकरण यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत तीन महिन्यांपूर्वी मारण्यात आलेल्या हमास म्होरक्यांची नावेही घोषित करण्यात आली आहेत. राव्ही मुश्ताहा हा हमास सरकारचा प्रमुख होता. तर समेह अल सिराज हा हमास सरकारचा संरक्षणमंत्री होता. मारला गेलेला तिसरा नेता सामी उदेह हा असून तो हमासचा प्रमुख कमांडर होता, अशी माहिती देण्यात आली आहे. हे तिघेही दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते.
हल्ला केव्हा केला
7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हमासच्या अनेक दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात घुसखोरी करुन अनेक निरपराध्यांची हत्या केली होती. त्यांनी 50 हून अधिक ज्यू नागरिकांचे अपहरण केले होते, तसेच अनेक महिलांवर बलात्कार केला होता, अशी माहिती नंतर देण्यात आली होती. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमास संघटनेची पाळेमुळे खणून काढण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने गाझापट्टीवर हल्ले केले. हमास सरकारचा प्रमुख ज्या सुरक्षित बंकरमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह लपला होता, त्या बंकरच्या स्थानाची अचूक माहिती मिळवून हल्ला करण्यात आला होता. याच हल्ल्यात हे तिघेही ठार झाले होते, अशी माहिती देण्यात आली.
हिजबुल्लावर हल्ले सुरुच
हिजबुल्लाच्या सात महत्त्वाच्या म्होरक्यांचा सात दिवसांमध्ये खात्मा केल्यानंतर इस्रायलने आता हिजबुल्लाच्या दहशतवादी यंत्रणेला खिळखिळे करण्याच्या दृष्टीने हल्ले चालविलेले आहेत. गुरुवारी दक्षिण लेबनॉनमध्ये तीन स्थानांवर केलेल्या वायुहल्ल्यात या संघटनेचे 15 हून अधिक हस्तक मारले गेले. बुधवारी दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलने आपले आठ सैनिक गमावले होते. मात्र आपले सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये योग्य ती कारवाई करत आहे, असे प्रतिपादन इस्रायलने केले आहे.
इस्रायलची नागरिकांना सूचना
इस्रायलच्या उत्तर सीमेवर दक्षिण लेबनॉनला लागून असणाऱ्या आपल्या 20 नगरांमधील नागरिकांना इस्रायलने सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना केली आहे. ही नगरे राहण्यासाठी सुरक्षित नसून ती रिकामी केली जावीत. हिजबुल्लाचा धोका संपल्यानंतर तेथे पुन्हा वास्तव्य केले जाऊ शकेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एक वर्षात 1,900 ठार
इस्रायल आणि हिजबुल्ला संघर्ष जवळपास वर्षभर होत असून या कालावधीत हिजबुल्लाच्या 1 हजार 900 हून अधिक हस्तकांना कंठस्नान घालण्यात आले आहे. 9 हजारांहून अधिक जखमी झाले असून जखमींमध्ये लेबनॉन नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. हिजबुल्लाचे हस्तक आणि दहशतवादी सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा उपयोग करत असल्याने सशस्त्र संघर्षात नागरिकही जखमी किंवा ठार होतात. तथापि, सर्वसामान्यांच्या जीविताची कमीत कमी हानी व्हावी, असा इस्रायलचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन त्या देशाने केले आहे.