For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुखांक वाढला पाहिजे

06:34 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
सुखांक वाढला पाहिजे
Advertisement

एक इंग्रजी वर्ष संपले आणि नववर्ष 2025 सुरु होऊनही चार दिवस उलटले विक एंड आला, वेग वाढतो आहे, प्रश्न वाढत आहेत, माणसे सुखाच्या शोधात धावत आहेत. पण समाधानाची स्मितरेषा अनेकांच्या चेहऱ्यावरुन हरवलेली आहे. सुखांक घटतो आहे. ओघानेच नववर्ष कोणाचे याचा शोध घेतला जातो आहे. गतवर्षी भरपूर पाऊस पडला. पावसाचे फटके अनेकांना बसले व बसत आहेत. यंदा थंडीही चांगली आहे. पण अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होऊन रस्ते वाहतूक अडचणीत आली आहे. निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सर्वांनाच बसत आहेत. ‘आज हिवाळा उद्या हिवाळा’ इतपतच हे कौतुक सिमीत राहिलेले नाही. निसर्गाचे रौद्र रूप सातत्याने सर्वांना भोगावे लागत आहे. महाथंडी, बर्फवृष्टी, महापूर, जलसंकट, दुष्काळ, अवकाळी ही आता नियमितता बनली आहे. जागतिक तापमान वाढत आहे. ते कमी करण्यासाठी कोणाएकाचा नव्हे तर सर्वांचाच सहभाग महत्त्वाचा असेल. प्रदूषण आम्ही मानवच करतो आहोत आणि

Advertisement

स्वत:साठी व भावी पिढ्यांसाठी न बुजणारे ख•s काढतो आहोत. पाण्यासाठी जगभर वाद, भांडणे आहेतच. जोडीला जागतिक स्तरावर युद्धे, दहशतवाद आणि धार्मिक दंगे यांचाही उच्छाद वाढला आहे. देशात एक कायदा, एक कर, एक निवडणूक यासाठी हालचाली आणि त्या विरोधी हल्लाबोल सुरु आहे. राजकारण सतत तापलेले आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष व नेते कोणतीही सीमा राखताना दिसत नाहीत. या सर्वाचा परिणाम गावगाड्यावर आणि ग्रामीण, गरीब मध्यमवर्गीय मंडळीवर होतो आहे. शहरांकडे आणि देश विदेशात स्थलांतर होते आहे. पोषाख, खाद्यसवयी, भाषा, विचार, व्यवहार, संबंध, लग्न यात झपाट्याने बदल होत आहेत काल परवापर्यंत आंतरजातीय विवाह करण्यास कचरणारा समाज, जात, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन वेगवेगळ्या वंशात विवाह करताना दिसत आहेत. लग्ने ही पॅकेजशी होतात आणि त्यातही, धर्मांतराची कारस्थाने असतात असे दिसून आले आहे. याचजोडीला तांत्रिक, यांत्रिक प्रगती आणि वेग या पार्श्वभूमीवर बेरोजगारी वाढत आहे. एआयमुळे आणखी काही काळाने नोकरी, भरती, आरक्षण हे शब्द हद्दपार होतील आणि लाडकेभाऊ, लाडकी बहिण, लाडके शेतकरी, लाडके मागास असे शब्द रूढ झाले तर आश्चर्य नको पण काळ बदलतो आहे, तंत्रज्ञान बदलते आहे, ज्ञान आणि ज्ञानाच्या परिभाषा देखील बदलत आहेत. एकीकडे शेअरबाजाराचा निर्देशांक वधारत आहे, जीडीपी वाढत आहे, कर संकलन वाढत आहे तर दुसरीकडे सुखांक घसरतो आहे, लोकसंख्या वाढते आहे, श्रीमंतांची श्रीमंती वाढत आहे, अन्नधान्यही चांगले पिकते आहे, पण उद्याच्या जगात आपला निभाव कसा लागणार याचा कुणालाच ठाव उरलेला नाही. एकीकडे डोळे दीपवणारी प्रगती आहे आणि दुसरीकडे डोळे भरुन यावे असे दैन्य, गरीबी आहे. सहज गेल्या दहा वीस वर्षावर नजर टाकली तर जे बदल दिसत आहेत. त्यामध्ये लिपीची व स्मरणशक्तीची साक्षरता वाढली आहे पण सुशिक्षित, आधुनिक नागरिक घटत आहेत, लोकसंख्या वाढते आहे. कुटुंब व्यवस्था अडचणीत आली आहे. लोकांच्या प्रचंड गर्दीत माणसाला एकाकीपण खायला उठते आहे. कुटुंबव्यवस्था पाठोपाठ लग्न संस्कारही अडचणीत आहे. लोकसंख्यावाढीचे अनेक क्षेत्रांत बरेवाईट परिणाम दिसत आहेत. ग्लोबलायजेशन आणि स्मार्ट फोन यामुळे जीवन व्यवहार बदलले आहेत. स्थानिक व्यापार, खरेदी विक्री व बाजारपेठ अडचणीत येऊन ऑनलाईन खरेदी विक्री आणि कुरियर उद्योग बहरला आहे. चोरी, खिसेकापू कमी होईनात, सायबर गुन्हे वाढले आहेत, घरगुती देशी खाद्यसवयी झपाट्याने बदलत आहेत आणि धाबासंस्कृती पाठोपाठ, नाष्टा सेंटर, बार, लिकर आणि नशा वाढते आहे. या सर्वाचा परिणाम जागोजागी चकाचक औषध दुकाने आणि दवाखाने बहरलेले दिसत आहेत. मराठी किंवा प्रादेशिक भाषांच्या शाळा बंद पडत आहेत आणि इंटरनॅशनल स्कूल वाढत आहेत, स्थूलता, रक्तदाब, मधूमेह, कर्करोग, आदीचे रुग्ण वाढत आहेत. एकीकडे वाचनालये बंद सदृश आहेत आणि तुरुंग ओसंडून आहेत. नेते आणि गुन्हेगार यांच्यातील अंतर नष्ट झाले अशी स्थिती आहे. सोन्याची दुकाने आणि खरेदी विक्री वाढत आहे. पण सोनं पिकवणारा बळीराजा अडचणीत आलाय. त्याच्या मालाला भाव नाही. यंदा पाऊस आणि अवकाळी यामुळे तो अडचणीत आहे, आंबा, द्राक्ष, काजू, ऊस, सोयाबीन उत्पादक नुकसानीचा सामना करत आहेत. एकुणच व्यवस्था, व्यवहार आणि परिणाम आणि सुधारणा व त्यांचा वेग यातील बदल माणसांचे सुख ओरबडताना दिसत आहे. शेअर बाजार वधारला असला तरी सुखाचा आनंदाचा मात्र टक्का घसरला आहे आणि तोच याच घडीचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपले साधू संत या संदर्भात सांगून गेले आहेत पण त्यांचे स्मरण महाप्रसादापुरते, जन्म पुण्यतिथीसाठी आणि जातीय मतपेढी जागवणेसाठी उरले आहे. गाथा, ज्ञानेश्वरी, हे ग्रंथ फुले वाहण्यापुरते जादा तर वापरले जात आहेत एक तरी ओवी अनुभवावी याचा आनंद घेताना लोक दिसत नाहीत. समाधान नाही, स्वास्थ्य नाही, संस्कार नाहीत, चारित्र्य नाही तो समाज नववर्षी कोणते संकल्प करतो आणि निभावतो याला महत्त्व आहे. डायरी लिहायची, झाडे लावायची, स्वच्छता राखायची, बाजारु अन्न सेवन करायचे नाही. दिवसातले किमान दोन तास कुटुंबासोबत घालवायचे, रोज व्यायाम करायचा, पुस्तके वाचायची. वृद्ध, अपंग, निराधार, एकाकी माणसांची सेवा करायची. बचत व गुंतवणूक साधायची असे अनेक संकल्प 31 डिसेंबरला केले जातात. आपणही केले असतील पण हे संकल्प फार तर आठवडाभर टिकतात आणि ये रे माझ्या मागल्या या चालीने, धाबे, बार, जातीयता सुरु होते आणि सोशल मीडियावर कॉपीपेस्ट टाईमपास करायचा या पलीकडे काही होत नाही. संकल्प काहीही असला तरी तो सर्वांना आनंद देणारा हवा, सुखांक वाढला पाहिजे आणि आधुनिकतेची कास पकडतानाच संस्काराचे, आदर्श परंपरांचे बोटही सोडता कामा नये.

Advertisement

Advertisement
Tags :

.