मनोनिग्रहाची परीक्षा
अध्याय पाचवा
मी कर्ता नाही असा विचार दृढ करून ईश्वराने जे दिलंय त्यात समाधानी राहून ईश्वराच्या अनुसंधानात राहिलं की, ईश्वरप्राप्ती होते असं हे दिसायला अगदी साधंसुधं असलेलं तत्वज्ञान माणसाच्या गळी सहजी उतरत नाही. त्याला संसारातील व्यक्तींची, वस्तूंची खूप ओढ असते. समोर दिसणाऱ्या वस्तू, व्यक्ती वा परिस्थिती कायम टिकणारी नाही हे त्याला कळत असतं पण मायेचा प्रभावच एव्हढा विलक्षण असतो की, त्यातून देवादिक सुद्धा सुटू शकत नाहीत. मग सामान्य माणसाची काय कथा? असं हे विषयरुपी आऱ्यांनी बनलेलं आणि कर्मरूपी खिळ्यांनी घट्टमुट्ट केलेलं संसारचक्र भेदून जाणं ही गोष्ट माणसासाठी अशक्यप्राय आहे. संसारचक्र घट्ट रहावं म्हणून विषयांचे आरे आणि कर्माचे खिळे ठोकलेले आहेत. विषयानुरूप इच्छा माणसाला होतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू होते. या संसार चक्राचे विषयांचे आरे आणि कर्माचे खिळे मनुष्याला जीवनभर गुंतवून ठेवतात. एक झालं की दुसरं अशी कर्मांची मालिका त्याच्या मागं लागते आणि त्यातच तो इतका गुंतून पडतो की, स्वत:च्या उद्धारासाठी काही करावं असं त्याच्या मनात असलं तरी त्यासाठी त्याला वेळच मिळत नाही. म्हणून बाप्पा म्हणत आहेत की हे संसार चक्र भेदायचं काम सामान्य माणसाला सहजी जमत नाही कारण त्याच्या अंगी तेव्हढं सामर्थ्यच नसतं. संसारातील व्यक्तींच्या बद्दल वाटणारी मोह मायेची सोनेरी बेडी त्याला तोडता येत नाही. असं बाप्पानी सांगितलं पण भक्ताच्या अडचणीला बाप्पा नेहमीच धावून येतात आणि जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी काही उपाय पुढील श्लोकात सांगतात.
अतिदु:खं च वैराग्यं भोगाद्वैतृष्ण्यमेव च ।
गुरुप्रसादऽ सत्सङ्ग उपायास्तज्जये अमी ।।22।।
अर्थ- अति दु:ख, वैराग्य, निरिच्छता, गुरुप्रसाद आणि सत्संग हे संसार चक्राला जिंकण्याचे उपाय आहेत.
विवरण- संसार चक्र भेदण्यासाठी, आहे त्यात समाधानी राहणे आवश्यक आहे पण तसा प्रयत्न करताना मनावर जबरदस्ती न करता त्याची समजूत काढावी लागते. त्यासाठी मनुष्याला बरीच तारेवरची कसरत करावी लागते. त्याची इंद्रिये आणि मन सतत बाह्य विषयांकडे ओढ घेत असते. त्या ओढीला आवर घालून प्राप्त परिस्थितीत समाधानी राहण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो. परंतु परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी काही हातपाय न मारता हा स्वस्थ का बसलाय हे लक्षात न आल्याने आजूबाजूचे लोक कुटाळक्या करतात, चेष्टा करतात. निरुद्योगी आळशी म्हणून हिणवतात. सुरवातीला माणसाला त्याबद्दल अतिशय दु:ख होते. आपण निवडलेला मार्ग बरोबर आहे की नाही अशी शंका येत राहते. त्याच्या मनोनिग्रहाची वारंवार परीक्षा होत असते. पण सोनं ज्याप्रमाणे अग्नितून तावून सुलाखून निघालं की त्याला एक नवी झळाळी प्राप्त होते आणि ते स्वयंतेजाने चमकू लागते त्याप्रमाणे, या सर्व दु:खदायक प्रसंगातून निग्रहाने पुढे जाऊन जो साधनामार्ग सोडत नाही, मनाची समजूत घालून त्याला विषयांपासून दूर ठेवतो व देहाला सुस्थितीत राखतो त्याची साधना सफल होते. यासाठी धर्मग्रंथांचे नित्य वाचन, त्यानुसार जीवनात आचरण, स्वकर्तव्यात तत्पर राहणे, कर्तव्य निरपेक्षपणे पार पाडल्यावर बाजूला होणे आणि बाप्पांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवून त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेणे हे उपाय आहेत.
तसेच वर सांगितलेल्या परीक्षेच्या प्रसंगातून तावून सुलाखून बाहेर पडण्यासाठी वैराग्य अंगी बाणवावे लागते. यासाठी आसक्ती सोडावी. कुणाकडून कसलीही अपेक्षा न केल्यास आपोआप आसक्ती दूर होते. आसक्तीमुळे हातून पापकर्मे घडतात तर आसक्तीरहित झाल्यास सुखशांती मिळते. मनोनिग्रहासाठी अभ्यास आणि वैराग्य ही दोन साधने भगवद्गीता सांगते.
क्रमश: