प्रचाराच्या तोफा थंडावल्या
उद्या मतदान, 23 नोव्हेंबरला निकाला : पुढील 36 तास प्रतिस्पर्ध्यांच्या जागत्या पहाऱ्याचे
अरविंद सुर्वे/ मुंबई
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचे दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीनेही जोरदार दणक्यात प्रचार केला. आता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे.
बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरे, मुंबादेवीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंह राजकारणातील दिग्गजांच्या सभांसह प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कुठे सभा घेण्यात आल्या. तर कुठे बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या. अनेक नेत्यांनी आपल्या होमग्राऊंडवर सभा गाजवल्या. सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांची मुंबादेवीत शेवटची सभा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुंबादेवीतील उमेदवार शायना एनसी यांच्यासाठी शेवटची सभा घेतली. शायना एनसी या मूळच्या भाजपच्या असून मुंबादेवी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी सांगता सभा घेतली.
वांद्रेमध्ये उद्धव ठाकरेंची सभा
वांद्रे पूर्वचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सांगता सभा घेतली. वरुण सरदेसाई यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी यांचं आव्हान आहे.
बारामतीत पवार काका-पुतण्याची सभा
परंपरेप्रमाणे शरद पवार यांनी त्यांची शेवटची सभा बारामतीमध्ये घेतली. त्यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी सांगता सभा घेतली. तर दुसरीकडे अजित पवारांनीही त्यांची सांगता सभा बारामतीमध्ये घेतल्याचं दिसून आलं. बारामतीमध्ये यंदा काका-पुतण्यामध्ये लढत असून अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं दिसून आले.
शिवसेना, मनसे, काँग्रेस, एनसीपी, भाजप हे राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे राजकारण चालते, तसे महाराष्ट्रात होऊ नये. महाराष्ट्राला संतांनी एकोप्याची शिकवण दिली. पण यांच्या स्वार्थी राजकारणासाठी आपण सगळे विसरतोय का, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.त्यांचे विचार लोकांना पटू लागले आहेत.
आचारसंहिता भंगाच्या 8,668 तक्रारी
दरम्यान आचारसंहिता सुरू झाल्यापासून 15 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल ?पवर एकूण 8 हजार 678 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 8 हजार 668 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.