जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मागे घेण्यास भाग पाडले पालकमंत्र्यांनी
कुमठा-शिरसी रस्ता बंदचा प्रयत्न केल्यास कारवाई
कारवार : कुमठा-शिरसी रस्ता रुंदीकरण संदर्भात कारवार जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी बजावलेला तो आदेश जिल्हा पालकमंत्री आणि भटकळचे आमदार मंकाळू वैद्य यांनी पाठीमागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्या दरम्यानचा समन्वय बिघडलेला तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे. कुमठा-शिरसी हा जिल्ह्यातील प्रमुख रस्ता आहे. जंगल प्रदेश आणि देवीमने घाटातून जाणाऱ्या या रस्त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी तालुके घाटमाथ्यावरील तालुक्याशी जोडले जातात. कुमठा-शिरसी दरम्यानच्या रस्त्याचे अंतर सुमारे 60 कि.मी. इतके असून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 440 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. या नियोजित रस्त्यावर काही पूल बांधले जाणार आहे. रस्ता रुंदीकरणाला 2021 मध्ये सुरुवात केली आहे. बांधकाम कंपनीने बांधकामाचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.
बांधकाम कंपनीच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाधिकारी गंगुबाई मानकर यांनी हा रस्ता पुढील सात महिने (1 नोव्हेंबर 2023 ते 2024 मे अखेर) वाहतुकीसाठी बंद ठैवण्याचा आदेश बजावला होता. त्यानुसार हा रस्ता बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद राहणार होता. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाबद्दल नाराजीचे सूर उमटले होते. वाहतूक बंद ठेवल्याने कुमठा ते शिरसी या पट्ट्यात वास्तव्य करणाऱ्या जनतेचे प्रचंड हाल होणार होते. शिवाय जनतेला अन्य मार्गाने प्रवास केल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार होता. वेळेचा व पैशांचा अपव्यवय होणार होता आणि म्हणून पहिल्यांदा कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाबद्दल आक्षेप नोंदवला आणि आदेश पाठीमागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर कुमठा येथील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या त्या आदेशाबद्दल आवाज उठविला आणि या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनाच्या त्या वाद्ग्रस्त आदेशाची जिल्हा पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी गंभीर दखल घेतली आणि जिल्हा प्रशासनाला तो आदेश पाठीमागे घेण्यास भाग पाडले. रस्ता बंद ठेवण्याचा प्रयत्न केलेल्यावर कठोर कारवाईचा इशारा पुढे वैद्य यांनी दिला आहे.