श्रीमंतांची वाढती श्रीमंती....
भारत हा गरीब लोकांचा देश असे म्हटले जाते. पण तसे पाहता श्रीमंतांची संख्याही या देशात अलीकडच्या काळात लक्षणीयरित्या वाढलेली आहे. अलीकडेच एका संस्थेने केलेल्या पाहणीत देशात 50 लाख रुपये उत्पन्न कमावणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यांची संख्या 10 लाखाच्या घरात पोहचली आहे. तसेच गेल्या पाचच वर्षात यांची संख्या वेगाने वाढताना दिसली आहे. कोरोनाच्या काळात अनेक देशांमध्ये आर्थिक स्थिती बिकट दिसली तरी भारतात मात्र स्थिती चांगली होती.
देशामध्ये जवळपास 10 लाख असे आहेत की ज्यांचे वर्षाचे उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आहे. अशा लोकांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये 25 टक्क्यांनी वाढलेली आहे. एका अहवालानुसार सदरची माहिती समोर आली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्च यांनी अलीकडेच एक पाहणी केली होती. आर्थिक वर्ष 2018-19 ते 2023-24 च्या कालावधीत श्रीमंतांच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले होते, हे आपण सारे जाणतोच. त्यामुळे अनेक देशांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेले होते. या महामारीने उद्योग क्षेत्रावर आणि दैनंदिन कार्यशैलीवरही मोठा परिणाम घडवून आणला होता. अनेकांचे रोजगार या काळात गेले, अनेकांचे सगेसोयरे कोरोनाने दगावले. त्यामुळे अनेक कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले. विविध दिग्गज देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोना आणि कोरोनाच्या पश्चात एक दोन वर्षांमध्ये मोठा परिणाम जाणवला होता. अनेक देशांची अर्थव्यवस्था खूप नाजूक झाली होती. या तुलनेमध्ये भारताची कामगिरी मात्र प्रशंसनीय राहिलेली आहे. बऱ्याचशा उद्योगांचा वेग मंदावलेला असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर देखील पाहायला मिळाला. बचतीवर भर देण्यात येऊ लागला. खर्चाचे प्रमाणही नियंत्रणात राहिले होते. वरील संस्थेच्या मते, मिळालेल्या माहितीनुसार श्रीमंत लोकांच्या संख्येमध्ये वाढ होत असून त्यांचे संयुक्त उत्पन्न देखील वेगाने वाढलेले दिसले आहे. दहा कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्यांची संख्या 31,800 इतकी आहे. 2018-19 ते 2023-24 आर्थिक वर्षात यामध्ये 121 टक्के वृद्धीसह पाहता यांचे एकूण उत्पन्न 38 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवणाऱ्यांचे संयुक्त उत्पन्न पाच वर्षांमध्ये 106 टक्के वाढत 40 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 50 लाख रुपयांपेक्षा अधिक कमावणाऱ्यांकडे एकूण 49 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जी गेल्या पाच वर्षांमध्ये 64 टक्के वाढली आहे.
एक मात्र आहे की वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये भारत इतर अर्थव्यवस्थांच्या देशांच्या तुलनेमध्ये खूप मागे आहे. भारतामध्ये केवळ 15 टक्के लोकच वित्तीय संपत्तीचे व्यवस्थापन योग्यतेने करत असतात. आघाडीवरच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांमध्ये हे प्रमाण 75 टक्केपर्यंत दिसून येते. हे पाहता भारतीय लोक वित्तीय व्यवस्थापन नियोजनात किती मागे आहेत हे दिसून येते. भारतीयांनी आपल्या वित्तीय नियोजनावर भर द्यायला हवा. 2028 पर्यंत पाहता श्रीमंतांकडे 184 लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार आहे. 2023 मध्ये या धनाड्यांकडे 1.2 लाख कोटी डॉलरची संपत्ती होती. त्याचप्रमाणे 2023 ते 2028 या कालावधीमध्ये श्रीमंतांच्या संख्येमध्ये दरवर्षाला 13 ते 14 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाजही सांगितला जात आहे.