भारत-चीन मैत्रीचा वर्धिष्णू आलेख
भारत-चीन मैत्रीसंबंधांचा आलेख गेल्या काही दशकांत प्रथमच मैत्रीपूर्ण आणि परस्पर हितवर्धक सहकार्यामुळे यशाच्या चढत्या आलेखबिंदूवर पोहोचला आहे. भारतीय मुत्सद्दी अजित डोभाल यांनी या सूत्रसंबंधांचे वर्णन ‘अपवर्ड ट्रेंड’ असे यथार्थ शब्दात केले आहे. वांग यी यांची भारतभेट ही खरोखरच निर्णायक आणि परस्पर हितवर्धक ठरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लादल्यानंतर भारताची व्यूहरचना ही रशिया-चीन यांच्याशी असलेले संबंध सुधारण्याच्या दिशेने आखली जात आहे. भू-राजनैतिक दृष्टीने विचार करता वांग यी यांची ही भेट खरोखरच एक नवे वळण म्हटली पाहिजे. ट्रम्प यांच्या बॉम्बला भारताने जसे ब्रह्मास्त्राने यशस्वी उत्तर दिले आहे, तसेच आता रशिया व चीनबरोबर मैत्री करून भारताने अमेरिकेविरुद्ध एक प्रभावी फळी पर्यायी शक्ती म्हणून संघटित करण्यास सुरुवात केली आहे. या दृष्टीने वांग यी यांच्या भेटीची फलिते लक्षात घेण्यासारखी आहेत.
जयशंकर यांची त्रिसूत्री
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन संबंधास स्थैर्य देण्यासाठी, परस्पर सहकार्याची गती वाढवण्यासाठी तीन आत्मसंबंधांवर भर दिला आहे. परस्परांविषयी सन्मान, आदरभाव तसेच संवेदनशीलता आणि परस्पर हितांचे संवर्धन या तीन तत्त्वावर आधारित ही मैत्री चिरकाल टिकणारी आणि तेवढीच सदाबहार राहू शकते. आपला सिद्धांत विकसित करताना जयशंकर यांनी असे म्हटले आहे की, मतभेदांचे रूपांतर संघर्षात होऊ नये. स्पर्धाही निरोगी असावी, ती भांडणाचे कारण ठरू नये ही दोन मूलभूत तत्वे जर उभयतांनी काळजीपूर्वक पाळली तर मैत्रीचा भाव खरोखर रचनात्मक आणि सकारात्मक पातळीवर पोहोचू शकतो, हे सूत्र त्यांनी मागील बीजिंग दौऱ्याच्या वेळी प्रभावीपणे मांडले आणि अजित डोभाल यांनी या सूत्राचा व्यत्यास मांडून दोन्ही देशांतील परस्पर सहकार्याची समीकरणे संपूर्णपणे बदलून टाकली आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर हे अभ्यासू आणि प्रतिभाशाली संशोधक आहेत. प्रत्येक पातळीवर ते नवे सिद्धांत मांडतात व ते कृतीमध्ये उतरवितात.
वांग यी यांच्या भारतभेटीचे ऐतिहासिक महत्त्व असे आहे की, गलवान खोऱ्यातील संघर्ष 2020 मध्ये झाला. त्यानंतर चिनी मुत्सद्यांची ही पहिली भारतभेट आहे. विशेषत: ट्रम्प यांच्या टेरिफ आघातानंतर बदललेल्या वातावरणात या भेटीला महत्त्व होते. जयशंकर यांनी मागे बीजिंगचा दौरा केला. त्यानंतर बरेच वातावरण निवळले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस. सी. ओ. म्हणजे शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीसाठी चीनमध्ये उपस्थित राहण्यास संमती दर्शविली आहे. उभय राष्ट्रांतील सीमाप्रश्न तसेच अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या योजना, विमानसेवा आणि व्हिसा नियमांचे शिथलीकरण या सर्व बाबतीत या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. भारत आणि चीनदरम्यान सीमा प्रश्नावर ही 24 वी बैठक होती. अजित डोभाल यांच्या चीनभेटीनंतर दोन्ही देशांत सीमेवर शांतता आहे आणि वर्षभरात सीमेवर निर्माण झालेली शांतता आणि स्थैर्य यामुळे या बैठकीला सकारात्मकतेचे संदर्भ प्राप्त झाले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या दोन्ही पत्रकांमध्ये परस्पर विकास व भागीदारीवर भर देण्यात आला आहे, ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे.
मुख्य फलिते कोणती?
दि. 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी चीनचे परराष्ट्रमंत्री आणि पॉलिट ब्युरोचे सदस्य वांग यी यांच्या भारतभेटीची मुख्य फलिते कोणती असतील, तर त्यामध्ये सीमा प्रश्नावरील 24 व्या फेरीतील चर्चेप्रमाणेच परस्पर व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेले काही निर्णय महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जीनिपिंग यांच्यात मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कझान येथे झालेल्या शिखर परिषदेत दोन्ही देशांत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने काही पाऊले टाकण्यात आली होती. आता ती खरोखर कृतीमध्ये उतरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या चीनभेटीसाठी पोषक असे उत्साहवर्धक वातावरण तयार करण्यासाठी ही चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भारतभेट वरदान ठरली आहे. चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी वैयक्तिक प्रतिसाद दिला आणि ठाम पाऊले टाकल्यामुळे हे शक्य झाले या शब्दात डोभाल यांनी त्यांचे कौतुक केले,
तर वांग यी यांनीसुद्धा उलट पक्षी डोभाल यांच्या प्रतिसादाचा विशेष उल्लेख केला. वांग यी यांच्या भारतभेटीमुळे उभय राष्ट्रांचे संबंध मजबूत होण्यासाठी एक रचनात्मक चौकट विकसित करण्यात आली आहे आणि ही चौकट जशी भक्कम होईल, तसे संबंध अधिक सुधारले जातील. ऑक्टोबर 2024 मध्ये दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू ही भूमिका प्रत्यक्षात कृतीमध्ये आणण्यात आली. व्यापाराच्या आघाडीवर चीनने भारताला खते, दुर्मिळ खनिजे, मैग्नेट आणि टनेल खोदणारी यंत्रसामग्री पुरविण्याचे मान्य केले आहे, हे एक सकारात्मक पाऊल आहे. शिवाय बऱ्याच काळापासून थांबलेला भारत-चीन भूमिपातळीवरचा व्यापार पुन्हा खुला होत आहे. प्रामुख्याने सीमेवरील तीन प्रमुख खिंडीतून हा व्यापार पुन्हा सुरू होईल. शिवाय दोन्ही देशांतील विमान सेवा आणि व्हिसा नियमसुद्धा सुलभ करण्यात येणार आहेत.
तैवानचा वादळी मुद्दा
जयशंकर यांच्या चीनभेटीच्या वेळी झालेल्या चर्चेतून चिनी प्रचार यंत्रणेच्या कुटील डावपेचातून धूर्त चिनी नेत्यांनी तैवान हा चीनचा भाग आहे, असे विधान जयशंकर यांनी केल्याचा दावा केला आहे. खरेतर जयशंकर यांनी असे विधान कधीही केलेले नाही. उलट पक्षी त्यांनी तैवान हे स्वतंत्र लोकशाही राष्ट्र आहे आणि त्याला स्वयंनिर्णयाचा हक्क आहे, असे म्हटले होते. इतर अनेक राष्ट्रांप्रमाणे भारताचे तैवानशी आर्थिक, व्यापारी व राजकीय संबंध आहेत. तसेच खुद्द चीनचे सुद्धा तैवानबरोबर व्यापारी संबंध आहेत, हेही भारताने वारंवार नमूद केले आहे. तेव्हा उगाचच जयशंकर यांच्या नावाने काही विधाने त्यांच्या तोंडी घालून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही चिनी प्रसारमाध्यमे करत आहेत. याला भारताने अचूक उत्तर दिले आहे तसेच ब्रह्मपुत्र नदीवर चीन धरण बांधण्याचा जो प्रस्ताव आखत आहे, त्याबाबत सुद्धा भारताने सातत्याने पारदर्शक भूमिका घेण्याचा आग्रह धरला आहे. खरे तर याबाबतीत भारताने सातत्याने एक सलग भूमिका घेऊन ती सुसंगतपणे मांडली आहे. चीनने भारताच्या या सर्व मतांचा आदर करावा, तसे झाले तर उभयराष्ट्रांत मतभेदांच्या शंकांचे मळभ आपोआप दूर होतील, ही जयशंकर कूटनीतीची उपलब्धी आहे.
या सर्व चर्चेवरून हे स्पष्ट होते की, वांग यी यांची भारतभेट अनेक अर्थाने निर्णायक व फलदायी ठरली आहे. या बैठकीमध्ये काही निश्चित ध्येय-उद्दिष्ट्यो समोर ठेवली होती आणि ती साध्य करण्यात आली आहेत. परस्पर संबंधांची एक व्यवहार्य चौकट तयार करण्यात आली आहे व तिच्या आधारे चर्चा सकारात्मक ठरली आहे. जयशंकर यांनी म्हटल्याप्रमाणे उभय देशांतील मतभेद हे संघर्षांचे बिंदू होऊ नयेत आणि तसेच स्पर्धा ही परस्परांच्या क्षमतांचे संवर्धन करण्यासाठी असावी, त्याचा अर्थ भांडण असा होत नाही. त्यामुळे या सर्व मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारत-चीन मैत्री निश्चित दिशेने पुढे सरकत आहे. डोभाल यांनी म्हटल्याप्रमाणे वांग यी यांची भेट ही खरोखरच एक नवी दिशा आहे, एक नवी सकारात्मक दृष्टी आहे. दोन्ही देशांतील प्रगती, समृद्धी आणि सुसंवादामुळे आशिया खंडातील या दोन महान सत्ता मानवतेच्या कल्याणासाठी काही चांगली कार्ये करू शकतील. मोदी यांचे वर्णन आधुनिक भारताचे माओ असे चीनमधील प्रसारमाध्यमे करत आहेत. त्यांच्या आगामी चीन दौऱ्याविषयी तेथील लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आणि आदरभाव दिसून येत आहे. एससीओ परिषदेत मोदी यांचे पदार्पण उभय देशांतील संबंध आणखी एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी निश्चितच फलदायी ठरतील,हे नक्की.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर