For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाचे क्रीडास्थान असलेल्या वाराणसीचे महात्म्य

06:44 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवाचे क्रीडास्थान असलेल्या  वाराणसीचे महात्म्य
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

मूळ भागवत ग्रंथ हा संस्कृतमध्ये असला तरी हा ग्रंथ मराठीत का लिहिला असा प्रश्न विचारून त्याकाळी बऱ्याच पंडितांनी त्याला आक्षेप घेतला होता. त्या आक्षेपाला उत्तर देताना नाथमहाराज म्हणतात, ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनाही भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश समजावा आणि त्यानुसार वागल्यामुळे त्यांचाही उद्धार व्हावा ह्या उद्देशाने जनार्दनस्वामींनी हा ग्रंथ मराठीत लिहून घेतला आहे हे लक्षात घ्यावे. हा ग्रंथ देशी भाषेत म्हणजे मराठीत लिहिला आहे म्हणून पंडितांनी त्याची उपेक्षा करू नये. परमात्मस्थितीवर नीजनिष्टा ठेवून त्यातील अर्थाकडे लक्ष द्यावे. मराठीत त्याचे निरुपण केले असले तरी त्याचे महत्त्व जाणून साधक व सज्ञान ह्यांनी त्याची उपेक्षा करू नये. श्री जनार्दन महाराजांनी आम्हाला असे शिकवले आहे की, कुणाचीच उपेक्षा न करता सर्वांना ब्रह्मरूपातच पहा. म्हणून जे ह्या ग्रंथाचा आदर करतील किंवा जे त्याची उपेक्षा करतील वा जे हा ग्रंथ कसा आहे, काय आहे हे काहीच न पाहता त्यांची निंदा करतील त्या सगळ्यांच्याकडे आम्ही ते ब्रह्मस्वरूप आहेत असे समजून पाहतो. ते जरी त्यांच्या स्वभावानुसार वागून त्यांच्यातील त्रिगुणांचे प्रदर्शन करत असले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये असे आमच्या सद्गुरूंचे सांगणे आहे. शिष्याचे रागारागाने चिडचिड करून बोलणे किंवा निंदकाचे टाकून बोलणे ज्या सद्गुरुना सहन होत नाही ते कोरडेच परमार्थी म्हणायला हवेत. त्यांना परमार्थाचे वर्म माहित असते परंतु ते त्यांच्या अंगी बाणलेले नसते. त्यामुळे कुणी राग राग केला किंवा निंदा केली की तेही खवळतात. असे सद्गुरू अक्षरश: क्षोभाने किंवा निंदेने नागवले जातात. म्हणून समोर दिसणाऱ्याच्या स्वभावातील त्रिगुणांचे प्राबल्य पाहत न बसता त्यांच्यात वसलेले ईश्वरी चैतन्य लक्षात घ्यावे. हे ईश्वरी चैतन्य सर्वांच्यात सारखेच वसलेले असते. असा थोर उपदेश आम्हाला जनार्दनस्वामींनी केला आहे. तो आम्ही अत्यादराने शिरोधार्य मानलेला आहे. त्यानुसार आचरण केल्याशिवाय आत्मज्ञानी जरी झाला तरी भवसागर पार करू शकत नाही. ह्याप्रमाणे गुरु ते गुरूच असतात आणि निंदक हा परमगुरु असतो कारण आमची निंदा करून तो आमच्यातील वैगुण्य आम्हाला दाखवत असतो. श्री जनार्दनस्वामींनी माझ्यातील मीपणासहित सकळ भूते गाडून टाकली आहेत. नंतरच ही ग्रंथरचना परमार्थाचे साधन म्हणून त्यांनी सिद्ध करून घेतली आहे. मी काही हा ग्रंथ लिहिण्यासाठी योग्य नव्हतो. ह्या ग्रंथाचा आरंभ प्रतिष्ठान म्हणजे पैठण येथे झाला. तेथे पाच अध्यायाचे निरुपण पूर्ण झाले. उरलेल्या ग्रंथाची रचना आनंदवनात विस्तारली आहे. ‘अविमुक्त’ ‘महास्मशान’ ‘वाराणसी’ ‘आनंदवन’ ही सर्व एका ठिकाणाचीच नावे असून तेथील महात्म्य आता ऐका. त्याला अविमुक्त असे म्हणतात कारण तेथे मृत्यू आल्यास नक्कीच मुक्ती मिळते आणि त्यात हा अधम, तो उत्तम असा फरक केला जात नाही. त्या सगळ्यांचाच उद्धार होत असल्याने त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. स्मशानात प्राण सांडल्यावरती पुढे मसणात जावे लागत नाही. म्हणून ह्या वाराणसीला ‘महास्मशान’ असे म्हणतात. येथे शेवटी स्वत: शिव ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. ह्या ठिकाणाला श्वेत ‘वरुणा’ ‘अशी’ मर्यादा असून मध्ये पंचक्रोशी नांदते. म्हणून ह्याला वाराणसी असंही म्हणतात. ह्याठिकाणी पातकाला थाराच उरत नाही. वरुणा पातकांचे वारण करते तर अशी महादोषांचा संहार करते. ह्या दोघींच्यामध्ये ही विश्वेश्वराची नगरी ‘वाराणसी’ वसलेली आहे. हे विश्वेश्वराचे क्रीडास्थान असून येथे स्वानंदे शिव क्रीडा करत असल्याने ह्या ठिकाणाला आनंदवन असेही म्हणतात.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.