For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णाच्या शरीर आणि कीर्तीचे महात्म्य

06:24 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णाच्या शरीर आणि कीर्तीचे महात्म्य
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

उद्धवाला पूर्ण ज्ञान होऊन तो बद्रीकाश्रमात गेल्यावर श्रीकृष्ण द्वारकेतच होते. पुढे तेथे काय काय घडले हे जाणून घेण्याची परीक्षित राजाला मोठी उत्सुकता लागून राहिली होती. ज्याला सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार स्वत:च्या इच्छेनुसार करता येतो. त्याने स्वदेहाचे विसर्जन कसे केले तसेच ब्रह्मशापामुळे यादव कुलाचा समूळ नाश होणार होता तो श्रीकृष्णाने कसा घडवून आणला हे त्याला जाणून घ्यायचे होते. म्हणून त्याने शुकमुनींना ते सर्व सविस्तर सांगण्याची विनंती केली. त्यानुसार शुकमुनींनी काय सांगितले, त्याचे निरुपण करताना नाथमहाराज म्हणाले, श्रीकृष्णाचे शरीर अतिशय सुंदर असल्याने त्याचा नाश होऊ नये अशी सर्वांची इच्छा होती. श्रीकृष्णाचे शरीर लोकांच्या डोळ्यांना आल्हाद देत असे. ते पाहताना लोकांना आनंद होत होताच पण त्याचबरोबर कृष्णाचे सुंदर शरीर पाहताना शिवशंकरांनाही अतिशय आनंद होत असे. अशा ह्या आल्हाददायक श्रीकृष्णाच्या तनुचे वर्णन कितीही केले तरी कमीच आहे. त्याच्या अकराही इंद्रियांची सर्वांनाच अवीट गोडी वाटते आणि त्यामुळे त्याच्यावर गाढ प्रेम जमते. त्याचा कधीही वीट येत नाही. स्त्रियांचे बाल, प्रौढ, मुग्धा, प्रगल्भा असे चार प्रकार असतात. त्या चारही प्रकारच्या स्त्रियांनी श्रीकृष्णाची मूर्ती एकदा बघितली की, पुन:पुन्हा मान वळवून पहिल्याशिवाय त्या रहात नसत. अगदी त्या जरी धार्मिक धैर्यवृत्तीच्या, पतिव्रता, महासती असल्या तरी श्रीकृष्णाला बघितल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले नाही असे कधी होत नसे. स्त्रिया मग त्या वयाने लहान असतील वा वृद्ध निष्काम झालेल्या असतील, त्यांनी एकदा श्रीकृष्णाला बघितले की, त्यांची सकाम नजर श्रीकृष्णावर खिळत असे. ज्याप्रमाणे मिठाची पाण्याशी गाठ पडली की, ते विरघळून जातेच त्याप्रमाणे स्त्रियांची नजर श्रीकृष्णावर पडली की, ती तेथून हटतच नसे. अशाप्रकारे एकदा श्रीकृष्णावर स्त्रियांची नजर पडली की, त्यांची नजर स्वत:ची शक्ती हरवून बसे. त्यामुळे त्यांचे डोळे हरिरूपाशिवाय काहीही पाहूच शकत नसत. अहो, स्त्रियांचं काय घेऊन बसलात त्या तर भोळ्याभाबड्या असतात पण परमार्थी आणि विरक्त असलेल्या संतांच्या कानी श्रीकृष्णाची कीर्ती पडली रे पडली की, त्यांच्या चित्तात श्रीकृष्ण मूर्ती ठसलीच म्हणून समजा. चित्तात श्रीकृष्णमूर्ती ठसली की, त्यांचे चित्त कृष्णाचा आकार धारण करते. कृष्णमूर्तीचा आणि त्याच्या कीर्तीचा महिमा हा असा आहे. संतांचे चित्त कृष्णमूर्ती आकर्षून घेते ह्यात नवल असे काही नाही कारण ते तर त्याचे अनन्य भक्त असतात पण जे असंत असतात त्यांनी कृष्णकीर्ती ऐकली की, त्यांचेही चित्त कृष्णमूर्तीचा आकार धारण करते. हे म्हणजे चंदन वृक्षावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे खैर, धामोडे इत्यादि झाडेही सुवासिक होतात. त्याप्रमाणे जे जे कृष्णकीर्ती ऐकतील त्या सर्वांच्यावर त्याचा सारखाच परिणाम होतो. मग त्या स्त्रिया असोत, संत असोत किंवा असंत असोत. जे भक्तिभावाने श्रीकृष्णकीर्ती ऐकतात ते असंत असले तरी संत होतात. मग संत आणि असंत असा काही फरक त्यांच्यात रहातच नाही. ज्या महाकवींनी श्रीकृष्णाच्या कीर्तीचे वर्णन केले त्यांना परम सौभाग्यस्थिती प्राप्त झाली. ह्या महाकवींनी वर्णन केलेली कृष्णाची कीर्ती जे इतरांना सांगतात त्यांनाही परमसौभाग्याची स्थिती प्राप्ती होते. जे श्रीकृष्ण कीर्तीचे पोवाडे अखंड गातात त्यांना शिव वंदन करत असल्याने त्यांच्या प्रत्यक्ष यम पाया पडतो. जेथे श्रीकृष्णाच्या कीर्तीचे कीर्तन चालते तेथे कर्माकर्मांची उजवण होऊन जन्ममरणसमवेत संसाराची बोळवण होते. ह्याप्रमाणे श्रीकृष्ण कीर्तीची महिमा सर्वच दृष्टीने अगाध आहे. श्रीकृष्ण कीर्तीच्या कविता तर तिन्ही लोकात परम पावन आहेत.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.