For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महान टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार!

06:10 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
महान टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार
Advertisement

लाल मातीवरील बादशाहचा टेनिसला अलविदा : अश्रू भरलेल्या डोळ्यांनी केली घोषणा,नोव्हेंबरमध्ये डेव्हिस चषकात शेवटचा सामना खेळणार

Advertisement

वृत्तसंस्था/माद्रिद (स्पेन)

जागतिक टेनिस विश्वावर अधिराज्य गाजवणारा व 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन स्पेनच्या राफेल नदालने गुरुवारी निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले. तो या हंगामानंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होईल. पुढील महिन्यात डेव्हिस कप फायनलमध्ये स्पेनसाठी तो शेवटचा सामना खेळेल. या 38 वर्षीय दिग्गज खेळाडूने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. या व्हिडिओमध्ये बोलताना राफाचे डोळेही पाणावले होते.

Advertisement

नदालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणाला,  टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय खूप विचार करून घेतला आहे. पुढील महिन्यात डेव्हिस कपमधील सामना हा कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. ही तीच स्पर्धा आहे जिथून त्याने 2004 मध्ये यशस्वी कारकिर्दीला सुरुवात केली होती. गेली दोन वर्षे दुखापतीमुळे खूप कठीण गेली आहेत. सततच्या दुखापतीमुळे हा कठीण निर्णय घेत असल्याचे त्याने सांगितले. नदालने 12 भाषांमध्ये पोस्टच्या कॅप्शनमध्ये सर्वांचे आभार मानले आहेत. याशिवाय, त्याने रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

लाल मातीतील सम्राट

नदालने आपल्या कारकिर्दीत तब्बल 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याची किमया साधली. वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत तो टेनिस आणि फुटबॉल खेळत असे. पण, पुढे जात नदालने जागतिक टेनिसविश्वावर अधिराज्य गाजवले. त्याचे काका टोनी नदाल यांच्या सल्ल्यानुसार तो टेनिस क्षेत्रात आला अन् पुढे इतिहास घडला. जागतिक टेनिसमधील ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या फ्रेंच ओपनचे जेतेपद सर्वाधिक म्हणजे 14 वेळा जिंकणारा नदाल हा पुरुष खेळाडू आहे. त्यामुळे नदालला लाल मातीचा राजा म्हटले जाते. फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर म्हणजेच लाल मातीपासून बनवलेल्या कोर्टवर खेळले जाते. लाल मातीचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदालने 2022 मध्ये 14 व्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला होता. नदालने 2022 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी ट्रॉफी

जिंकली तेव्हा तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर

चॅम्पियन बनला. फ्रेंच ओपनमध्ये 19 वेळा भाग घेत असताना नदालने 112 सामने जिंकले आहेत आणि त्याला फक्त 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

गोल्डन स्लॅम

नदालने आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन आणि 4 यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय, ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. जगातील फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी गोल्डन स्लॅम जिंकले आहेत. यामध्ये नदालचा समावेश होतो. गोल्डन स्लॅम म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू एका कॅलेंडर वर्षात चार ग्रँडस्लॅम जिंकतो आणि त्याच वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो. टेनिस विश्वास रॉजर फेडरर, नोव्हॅक जोकोविच व राफेल नदाल यांनाच अशी कामगिरी करता आली आहे.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल दुसरा खेळाडू

पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा दुसरा खेळाडू आहे. नदालने 22 जेतेपद पटकावले आहेत. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली होती.

एक दशक अन् ते तिघे...

रॉजर फेडरर, राफेल नदाल व नोव्हॅक जोकोविच हे तिघे अलीकडील एका दशकातील महान टेनिसपटू. 2022 मध्ये महान टेनिसपटू फेडररने टेनिसला अलविदा केला. यानंतर आता स्पेनचा दिग्गज खेळाडू राफेल नदालनेही आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या तीन दिग्गजांचा खेळ पाहून टेनिसच्या प्रेमात पडलेल्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे. फेडररनंतर बेस्ट असे नदालला म्हटले गेले आणि त्याने आपल्या खेळातून सिद्धही केले. त्याला टक्कर देण्यासाठी कोर्टवर जोकोविच होताच. पण या तिघांनी एक दशक गाजवले. आपल्या अफलातून खेळातून जगभरातील क्रीडाप्रेमींना अक्षरश: वेड लावले. पण आता त्यांच्या निवृत्तीचे सत्र सुरु झाले आहे. फेडररनंतर नदालनेही टेनिसविश्वाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नदालची कारकीर्द

  • कारकिर्दीतील एकूण जेतेपदे        92
  • ऑस्ट्रेलियन ओपन      2
  • फ्रेंच ओपन                14
  • विम्बल्डन                  2
  • अमेरिकन ओपन        4
  • ऑलिम्पिक सुवर्ण        2
Advertisement
Tags :

.