फोर्ट रोडवरील खाड्यांना डबक्याचे स्वरुप
प्रशासनाचे दुर्लक्ष, रस्त्यामुळे व्यापारी हतबल : नाल्यांची त्वरित स्वच्छता करण्याची मागणी
बेळगाव : फोर्ट रोड येथील रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. मागील चार दिवसात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने खाड्यांमध्ये पाणी साचल्याने डबकी तयार झाली आहेत. अशा खाड्यांमधूनच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. आधीच या परिसरात अस्वच्छतेने व्यापारी नाराज असताना आता खाड्यांमुळेही येथील व्यवसायांना फटका बसत आहे.
तानाजी गल्ली, रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद झाल्याने ही वाहतूक धारवाड रोड उड्डाणपुलावरून फोर्टरोडमार्गे शहरात वळविण्यात आले. यामुळे फोर्ट रोडवरून ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच माल उतरण्यासाठी रविवार पेठ येथे आणलेले ट्रक या ठिकाणी अडकल्याने कोंडीत वाढ होत आहे.
जिजामाता चौकापासून देशपांडे पेट्रोलपंपपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठमोठे खड्डे पडले आहेत. पंधरा दिवसापूर्वी या रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या स्टेशन रोडचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु फोर्ट रोडची साधी डागडुजीही करण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. दुचाकी चालकांना खाड्यांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत आहेत.
फोर्ट रोडवरील खाड्यांमुळे येथील व्यापाऱ्यांनाही फटका बसत आहे. रस्ता खराब तर आहेच. त्याचबरोबर गटारींची स्वच्छता वेळच्यावेळी केली जात नसल्याने पावसाचे पाणी साचत आहे. शहरात जरा जरी पाऊस झाला तरी फोर्ट रोड येथे पाणी साचते. त्यामुळे फोर्ट रोडवरील गटारींची तसेच नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणीही व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.