कबर पंधराशे वर्षांपूर्वीची...
या जगात अशी अनेक स्थाने आहेत, की ज्यांची रहस्ये आजही अज्ञात आहेत. जेव्हा ही रहस्ये उजेडात येतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. जर्मनीत इतके दिवस अज्ञात असणारी 1.500 वर्षांपूर्वीची एक कबर अशाच प्रकारे सध्या चर्चेचा विषय झाली आहे. आठ वर्षांपूर्वी ही कबर असणाऱ्या परिसराचा शोध संशोधकांना लागला होता. या परिसरात उत्खनन करताना या कबरीचा शोध लागला आणि ती दीड हजार वर्षांपूर्वीची असल्याचेही समजले.
ही कबर उघडली असता तिच्यात महिलांना पूर्वीच्या काळात उपयुक्त ठरणाऱ्या वस्तू आढळल्या. ही कबल फॉरींग विभागातील बावारिया येथे आहे. कबरीत काशाच्या धातूच्या दोन चाव्या, हाडांपासून बनविलेल्या सुया आणि त्या ठेवण्यासाठीचा डबा, काशाच्या धातूच्या अंगठ्या, रोमन भाषेतील काही मुद्रा, अक्रोडाचे कवच, समुद्री प्राण्यांचे कवच आदी सामग्री सापडली आहे. ही सामग्री त्यावेळच्या मानवी जीवनावर प्रकाश टाकण्यास उपयुक्त आहे, असे संशोधकांचे मत आहे. या वस्तूंवर आता अधिक संशोधन होत आहे. या कबरीत अशा काही वस्तू सापडल्या आहेत, की ज्यांच्यामुळे त्यावेळचे धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन् कसे होते, याची माहिती मिळणार आहे. त्याकाळी जर्मनीत ‘डॅन्यूब लाईम’ नामक संस्कृतीचा बोलबाला होता. या संस्कृतीवरही या शोधामुळे प्रकाश पडणार आहे.